
प्राथमिक टप्प्यात २७ चित्रपट अनुदानास पात्र
मुंबई, ता. २९ : चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीसाठी अर्थसाह्य देण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या एकूण २३ चित्रपटांसाठी तसेच २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि इतर २ चित्रपट अशा एकूण २७ चित्रपटांकरिता प्राथमिक टप्प्यात ८ कोटी ६५ लाख रुपये इतक्या रकमेचे अनुदान संबंधित निर्माते किंवा निर्मितीसंस्थांना धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी दिली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे मराठी चित्रपट निर्मात्यांना देण्यात येणारे अनुदानाचे वाटप याबाबतचा विषय महामंडळाच्या संचालक बैठकीत घेण्यात आला होता. त्यावेळी मंत्री देशमुख यांनी संबंधितांना अनुदान वाटपासंदर्भातील सूचना दिल्या. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसाह्य योजनेअंतर्गत महामंडळाकडे अर्थसाह्याठी प्राप्त झालेल्या चित्रपटांपैंकी ५५ चित्रपटांचे परिक्षण जानेवारी २०२२ मध्ये शासनाने गठित केलेल्या चित्रपट परिक्षण समितीकडून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे करण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे दर्जेदार चित्रपट निर्मितीस अर्थसाह्य योजनेनुसार ‘अ’ दर्जा प्राप्त चित्रपटांकरिता ४० लाख रुपये आणि ‘ब’ दर्जा प्राप्त चित्रपटांकरता ३० लाख रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात येते. परिक्षणाअंती ज्या चित्रपटांना ७१च्या पुढे गुण असतील त्यांना ‘अ’ दर्जा व ५१ ते ७० गुण असणाऱ्या चित्रपटांना ‘ब’ दर्जा देण्यात येतो. ज्या चित्रपटाला ५१ पेक्षा कमी गुण मिळतील तो चित्रपट अपात्र ठरतात. राज्य, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना कोणत्याही परिक्षणाशिवाय ‘अ’ दर्जा बहाल होतो, मात्र चित्रपट प्रदर्शनासंबंधीच्या अटींची पूर्तता होत असल्यास त्यास ‘अ’ दर्जाप्रमाणे अर्थसाह्य लागू होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87370 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..