
एक आमदार तरी निवडून आणू शकता का?
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २९ ः जे आमदार शिंदे साहेबांसोबत आहेत, त्यांच्याविषयी अपशब्द वापरले जात आहेत असा आरोप करीत कोणाला बोलत आहेत हे? ज्यांनी संघटनेसाठी ४० वर्षे दिली. तुम्ही काय दिलेत? असा सवाल करत एक नगरसेवक किंवा एक आमदार तरी आपण निवडून आणू शकता का,असा सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना केला आहे. या वेळी ते दिव्यात बोलत होते.
राऊत यांनी आमदारांविषयी अपशब्द वापरले असल्याचा आरोप करीत खासदार श्रीकांत शिंदे राऊत यांच्याविरोधात या वेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार राऊत यांनी केलेल्या व्यक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी या वेळी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, की ज्यांनी शिवसेनेच्या संघटनेसाठी ४० वर्षे दिली त्याच्याविषयी आपण असे उद्गार काढत आहात. एक नगरसेवक किंवा एक आमदार तरी आपण निवडून आणू शकता का? जे आमदार गेले त्यांच्या जीवावर खासदार म्हणून निवडून गेले, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचे काम त्यांच्याकडून चालू असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या वेळी म्हणाले. पालकमंत्री शिंदे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे, असेदेखील खासदार डॉ. शिंदे या वेळी म्हणाले.
दिव्यात शक्तिप्रदर्शन
दिव्यात बुधवारी शिंदे गटाने मोठे शक्तिप्रदर्शन करत आपली ताकद दाखवली. या वेळी दिव्यातील आठही नगरसेवक हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याचे सांगण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खासदार शिंदे यांनी पालकमंत्र्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87372 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..