
वसई तालुक्यातील रस्ते जलमय, गृहसंकुलात पाणी शिरले
वसई, ता. ३० (बातमीदार) ः वसई-विरार शहरात पावसाने चांगली हजेरी लावली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यातच ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले असून इमारतींतही पाणी शिरले असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली जात आहे.
वसई तालुक्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. नालासोपारा तुळींज, ओसवाल, सातिवली, साईनगर, वसई गाव, विरार पूर्व यासह सखल भागांत पाणी साचले असल्याने वाहनांत पाणी शिरून बिघाड होत आहे. विद्यार्थ्यांनाही पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
वसई-विरार महापालिकेने शहरातील नाल्यांची व गटारांची साफसफाई केली असली तरी सखल भाग पाण्याखाली येत आहे. याचा परिणाम काही गृहसंकुलांत पाणी शिरले आहे. गटारांचे घाण पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्वरित कार्यवाही करण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली व स्वच्छता विभागाला सूचना दिल्या असल्या तरी अनेक भागांत पाणी, गटारांचा प्रश्न ‘जैसे थे’ या परिस्थितीत दिसून आला आहे.
वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून याठिकाणी जाणाऱ्या कामगारांना सकाळी फटका बसला. पाऊस असल्याने मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. अन्य वाहनांची रांग लागली होती. जरी पावसाळी कामे प्रशासनाने पूर्ण केली असली तरी मात्र एका दिवसात पावसाने रस्ते जलमय झाले. त्यामुळे पाऊस असाच सुरू राहिला तर वसई बुडण्याची शक्यता आहे.
अधिकारी आहेत कोठे?
वसई-विरार महापालिकेने सखल भागाची ठिकाणे घोषित केली. पाणी साचल्यास थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. मात्र अनेक ठिकाणी पाणी साचले असताना यंत्रणा व अधिकारी गेले कुठे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
घाण पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास
वसईत रस्त्यावर पाणी साचले असून याच घाण पाण्यातून एका हातात छत्री सांभाळत विद्यार्थी चालत प्रवास करत आहेत. त्यामुळे साथीच्या आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87426 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..