
भिवंडीत बोगस डॉक्टर गजाआड
भिवंडी, ता. १ (बातमीदार) ः गरीब, गरजू कामगार कुटुंबीयांची गरज ओळखून उपचाराच्या नावाखाली त्यांच्याकडून भरमसाठ फी उकळणाऱ्या एका बोगस डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे परिसरात उपचाराच्या नावाखाली दुकान थाटून बसलेल्या इतर बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ माजली आहे.
कामगारांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातील कामगार वस्ती व झोपडपट्टी भागात काही बोगस डॉक्टर दवाखाने उघडून बसले आहेत. या डॉक्टरांकडून अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. आज डॉक्टर दिनाच्या दिवशी भिवंडी शहरात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काफील अ. जीमल अ. अन्सारी असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. शहरातील हंडी कंपाऊंड गल्ली नं. पाच या ठिकाणी हा डॉक्टर दवाखाना थाटून नागरिकांवर उपचार करीत होता. त्याबाबत पालिका वैद्यकीय विभागाकडे नागरिकांनी तक्रार केली असता पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शम्मीम सलाम अन्सारी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी त्याच्याजवळ महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनचे कोणतेही अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या डॉक्टरास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87517 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..