वसईत उभे राहणार ‘स्‍मार्टपोल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत उभे राहणार ‘स्‍मार्टपोल’
वसईत उभे राहणार ‘स्‍मार्टपोल’

वसईत उभे राहणार ‘स्‍मार्टपोल’

sakal_logo
By

वसई, ता. २ (बातमीदार) ः नागरिकांची सुरक्षितता, पालिकेला उत्पन्न व जाहिरात क्षेत्राला डिजिटलची झळाळी, अशी तिहेरी सांगड घालत वसई-विरार महापालिकेने स्मार्ट पोल उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली असून येत्या सहा महिन्यांत महापालिका क्षेत्रात ३०० बहुद्देशीय स्मार्ट पोल उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नालासोपारा, वसई, विरार व नायगाव या प्रमुख शहरांमध्‍ये गुन्ह्यांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात आहे. तपास करताना अनेकदा सीसी टीव्हीचा फायदा होत असतो. त्यामुळे महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार व पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी बैठक घेत शहरात सीसी टीव्हीबाबत चर्चा केली होती. त्यानुसार पोलिसांकडून जागेची यादीदेखील महापालिकेला देण्यात आली. त्‍यानुसार सीसी टीव्‍हीचे जाळे उभारण्याबाबत पालिकेने सकारात्मक पावले उचलली आहेत. यासाठी शहरात स्‍मार्ट पोल उभारण्यात येणार आहेत. तसेच या पोलवर शहरातील व्यावसायिकांच्‍या जाहिराती लावण्यात येणार आहेत. ज्‍यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. तसेच याच पोलवर एलईडी विद्युत यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. सोबतच प्रत्येक पोलवर इंटरनेट बूस्टर लावण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांसोबतच पालिकेलाही याचा फायदा होणार आहे. पालिकेला यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नसल्याने बहुउद्देशीय स्मार्ट पोल योजना फायद्याची व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी ठरणार असल्‍याचा प्रशासनाचा दावा आहे.

सीसी टीव्‍हींचे जाळे पसरणार
वसई-विरार शहरातील १५ पोलिस ठाण्यांमध्‍ये कंट्रोल रूम उभारून इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहे. जेणेकरून शहरातील बारीक हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. अगोदरच व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, गृहसंकुल परिसरात सीसी टीव्ही लावण्यात आले आहेत. त्यात या स्‍मार्ट पोलद्वारे आणखी ९०० सीसी टीव्हींचे जाळे पसरणार आहे. यामुळे गुन्‍हेगारीला आळा बसेल, अशी आशा आहे.

स्मार्ट पोल संकल्पना
शहरात एकूण ३०० स्मार्ट पोल
प्रत्‍येक पोलवर तीन सीसी टीव्ही कॅमेरे
स्मार्ट पोलपासून वर्षाला ९६ लाख रुपये अपेक्षित उत्पन्न
सहा महिन्यांत योजना कार्यान्वित
१५ पोलिस ठाण्यांत कंट्रोल रूम व्यवस्था
एलईडी विद्युत रोषणाई

महापालिकेने स्मार्ट पोलसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. सहा महिन्यांत पोल उभारण्यात येतील. सीसी टीव्हीमुळे गुन्ह्याची उकल करण्यास पोलिसांना फायदा होईल. पालिका पोल उभारण्यासाठी कोणताही खर्च करणार नाही. कंत्राटदाराकडून पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. ही बहुउद्देशीय संकल्पना नागरिक व प्रशासनाला फायदेशीर ठरणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87543 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..