पावसाळ्यात जपा आरोग्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात जपा आरोग्य
पावसाळ्यात जपा आरोग्य

पावसाळ्यात जपा आरोग्य

sakal_logo
By

शुभांगी पाटील, तुर्भे

‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे पाऊस दरवर्षी हजेरी लावतो, पण त्या काळात आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पावसाबरोबरच रोगांचे आगमनही होते. पावसाळ्याच्या दिवसांत योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या दिवसांत आपली पचनक्रिया मंद झालेली असते. पावसाळ्यात दूषित अन्न व पाण्यामुळे अनेक आजारही होत असतात. यासाठी पावसाळ्यात योग्य आहाराचे नियोजन ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे पावसाळ्यात आहार कसा असावा, हे अनेकांना ठावूक नसल्याने साथीच्या आजारांना निमंत्रण मिळते.

पावसात उघड्यावर विकले जाणारे वडे, समोसे व भजी खाताना मज्जा येते; पण काही वेळा गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. जुलाब, अतिसार, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, अतिसार, संग्रहणी यांसारखे काही आजार पावसाळ्यात खूप प्रमाणात पसरतात. पावसाळ्यात हेपेटायटीस-ए या रोगाचा संसर्ग सहज होऊ शकतो. पावसाळ्यामध्ये पचनक्रिया मंद झाल्याने अन्नाचे पचन योग्यप्रकारे होत नाही. यासाठी पावसाळ्यात पचनास हलका आणि ताजा, गरम आहार घ्यावा. आहारात लाह्या, मुगाचे वरण, तूप घालून वरणभात, फळभाज्या, भाज्यांचे गरम सूप यांचा समावेश करावा. पावसाळ्यात भूक वाढवणारा आणि अन्नाचे पचन करणारा आहार घ्यावा. यासाठी मिरे, हिंग, सुंठी, आले, लसूण, जिरे, पिंपळी या दीपन-पाचन करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

धान्ये व कडधान्ये
पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. पचनास हलकी असणारी मूगडाळ आहारात घ्यावी. मूगडाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे.

पालेभाज्या
पावसाळ्यामध्ये पालेभाज्या कमी खाव्यात. या दिवसांत पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या जास्त खाव्यात. स्वच्छ करूनच भाज्यांचा आहारात उपयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. विविध भाज्यांचे गरम सूप प्यावे.

पावसाळ्यातील फळे
पावसाळ्यात फळे स्वच्छ करूनच खावीत. जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे. कारण यामुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची अधिक शक्यता असते.

मांसाहार
मांसाहारी पदार्थ हे पचनास जड असतात. पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ म्हणजे मटण, मासे खाणे शक्यतो टाळावे.

पावसाळ्यात काय टाळावे
थंडगार पदार्थ, दही, लोणची, ब्रेड, जास्त खारट पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळावे. बाहेरचे उघड्यावरील भेळ, पाणीपुरी यासारखे पदार्थ, माशा बसलेले अन्न, शिळे पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न पावसाळ्यात टाळावे. मांसाहारी पदार्थ पचनास जड असल्याने टाळावे. तळलेले पदार्थ पचण्यास जड व पित्त वाढवत असल्याने जास्त खाणे टाळावे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87578 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..