गावागावांत वळगनीसाठी धडपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावांत वळगनीसाठी धडपड
गावागावांत वळगनीसाठी धडपड

गावागावांत वळगनीसाठी धडपड

sakal_logo
By

देवेंद्र दरेकर, पोलादपूर
पोलादपूर तालुक्यात पावसाला सुरुवात होताच मासे खवय्यांची चंगळ सुरू झाली आहे. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावणारे आदिवासी बांधव मासे पकडून सावित्री, कामथी, ढवळी, चोळई नदीपात्रात दिवस-रात्र जाळे टाकून मासे पकडत आहेत. खरंतर पावसाळ्यात या माशांना जोरदार मागणी असते. त्यामुळे गावागावांत नागरिक खवय्ये शेतात व ओव्हळीत जाऊन वळगन मारत आहेत.
-----
अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या रायगडवासीयांची प्रतीक्षा संपली आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने नद्या, नाले वाहू लागले आहेत. याच दरम्यान गावा-खेड्यांसह सर्वांनाच आकर्षण असते ते म्हणजे वलगणीच्या माशांचे. पोलादपुरातील खवय्ये झिला, मच्छरदाणी, पगीर घेऊन नदीचा बांध, शेतमाळ, ओव्हळ गाठत वलगण मारण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. तर काही जण छत्रीच्या साह्याने मासे पकडत आहेत. या वेळी शिवडा, खवल, दांडाळी, वाम्ब, पांडरुस, मळे असे विविध जातींच्या अंड्यानी भरलेले मासे खवय्यांनी पकडून नेले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खवय्‍यांनी जोरदार वळगन पकडली आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहिला, तर मोठमोठे मासेही तीन ते चार दिवसांमध्ये नागरिकांना पकडता येणार असल्याचे बोलले जात आहे. वळगणीचे (डोंगर माथ्यावरून किंवा आडमार्गाच्या नाल्यातून पाण्याच्या प्रवाहासोबत नदीकडे जाणारे) छोटे-मोठे मासे पकडण्यासाठी मच्छीमारांसह मत्स्यप्रेमीही वळगण घेण्यासाठी धावाधाव करू लागले आहेत. ग्रामीण भागात वळगणीच्या माशांना अंड्यांमुळे मोठी मागणी असते. पुढील सात ते आठ दिवस वळगणीसाठी नागरिक मग्न असणार आहेत. सध्या हे मासे १८० ते २०० रुपये किलोने विक्री होत आहे.


गेले दोन दिवस पाऊस जोरदार असून मासे अंडी सोडण्यासाठी शेतात येत आहेत. आम्ही गावकरी झिला, मच्छरदाणी घेऊन मासे पकडतो. या माशांची चवच न्यारी असून एक वेगळीच धमाल असते.
- रोशन दुधाने, वळगन मारणारा गावकरी

वळगन म्हटल्यानंतर महाड, पोलादपुरात एक वेगळीच पर्वणी मानली जाते. वळगनीसाठी आम्ही कामही बाजूला ठेवतो. नद्या, शेत व ओव्हळ या ठिकाणी मासे पकडण्याच्या विविध पद्धतीचा अवलंब या वेळी करतो. हे मासे अंड्याचे असल्यामुळे त्यांची चवच भारीच असते.
- निवेदन दरेकर, स्थानिक तरुण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87592 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top