
ठाण्यात पावसामुळे पडझडीच्या घटना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ ः पावसाने गेल्या चोवीस तासांत चांगली बॅटिंग केल्याने ठाणे शहरात ९०.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकीकडे पाऊस कोसळत असताना, दुसरीकडे पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल तक्रारींचा पाऊसही सुरू होता. चोवीस तासांत तक्रारींचा आकडाही ४६ वर पोहोचला आहे. सर्वाधिक १३ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच सखल भागात पाणी साचणे, संरक्षण भिंतीसह स्लॅब पडणे आदी घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून झाडे पडल्याच्या घटनांमध्ये काही प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. १ जुलै रोजी सकाळी ८.३० पासून २ जुलै रोजी सकाळी ८.३० दरम्यान, शहरात दमदार पाऊस झाला आहे. या चोवीस तासांत ९०.३९ मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत ४१३.३९ मिमी पाऊस शहरात पडला आहे. दुसरीकडे शहरात पावसामुळे सखल असलेल्या सहा भागांत पाणी साचले होते. तसेच वेगवेगळ्या १३ ठिकाणी झाडे कोसळून पडली, तर ९ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. तसेच धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची तक्रार आलेली होती. त्याचबरोबर इमारतीचा सज्जा तसेच घराचा काही भागही कोसळला आहे. वेगवेगळ्या तीन ठिकाणी संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. तसेच इतर ८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी झाड किंवा भिंत, सज्जा पडून काही ठिकाणी वित्तहानी झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87619 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..