
चुकीचा खाते क्रमांक टाकल्यामुळे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : चुकीचा बँक खाते क्रमांक नमूद केल्यामुळे दुसऱ्याच्या खात्यात जमा झालेले सात लाख रुपये मिरा-भाईंदर वसई-विरार सायबर गुन्हे कक्षामुळे मिरा रोडच्या महिलेला परत मिळाले आहेत. हा प्रकार शनिवारी (ता. २) मिरा-भाईंदर येथे उघडकीस आला.
या महिलेला तिच्या नातेवाईकांना सात लाख रुपये पाठवायचे होते. त्यांनी मिरा रोडच्या बँकेत जाऊन पावती भरून हे पैसे नातेवाईकांना पाठवून दिले. पैसे पाठवल्याचे महिलेने नातेवाईकांना कळवल्यावर त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेने बँकेत जाऊन चौकशी केली असता खाते क्रमांकातील एक क्रमांक चुकीचा नमूद केल्यामुळे रक्कम दुसऱ्याच खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेने यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचा व्यवहार रद्द करावा व रक्कम परत मिळावी अशी मागणी केली, परंतु बँक व्यवस्थापकाने संबंधित रक्कम तक्रारदार महिलेने स्वत: पाठवली असल्यामुळे परत मिळू शकणार नाही असे सांगितले.
त्यानंतर महिलेने सायबर गुन्हे कक्षात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तांत्रिक विश्लेषण करून रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली आहे त्याची माहिती घेतली. त्या वेळी ही रक्कम मुंबईतील एका बँकेच्या ग्राहकाच्या खात्यात जमा झाल्याचे दिसून आले. या बँकेशी पत्रव्यवहार करून पोलिसांनी संबंधित ग्राहकाशी संपर्क साधला; मात्र सुरुवातीला त्या ग्राहकाने आपल्याला लॉटरी लागल्याने खात्यात सात लाख रुपये जमा झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या ग्राहकाला वस्तुस्थिती सांगून सात लाख रुपये तक्ररादार महिलेला परत करावेत; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली. त्यामुळे सात लाख रुपयांची रक्कम त्या ग्राहकाने तक्रारदार महिलेच्या खात्यात पुन्हा वर्ग केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87620 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..