
आगीत होरपळून महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गावात एका बंगल्यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. जयश्री म्हात्रे असे मृत महिलेचे नाव आहे. घराला लागलेली आग विझविताना चार जण गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कल्याण पूर्व येथील चिंचपाडा गावातील आई बंगल्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. बंगल्यात राहणारे म्हात्रे कुटुंबीय त्या वेळी गाढ झोपेत होते. आगीच्या झळा बसताच सदस्य जागे झाले. जयश्री यांचा मुलगा सूरज याने इतर तिघांच्या साथीने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र या आगीत सूरज यांच्या आईचा होरपळून मृत्यू झाला. आग विझविणारे चारही जण भाजले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेजाऱ्यांनी ही माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
या दुर्घटनेत मृत पावलेल्या जयश्री यांचे पती भरत म्हात्रे हे उत्तर भारतात देवदर्शनाला गेल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. यासंदर्भात विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात जयश्री म्हात्रे यांच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87676 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..