
१०० कोटीहून अधिकच्या बँकिंग फसवणुकीत घट
१०० कोटींहून अधिकच्या बँकिंग फसवणुकीत घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या फसवणुकीच्या प्रकरणात लक्षणीय घट झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. २०२२ च्या पहिल्या सहामाहीत बँकिंग फसवणुकीचे ११८ प्रकार नोंदले गेले. २०२०-२१ मध्ये हाच आकडा २६५ इतका होता. २०२१-२२ मध्ये ४१ हजार कोटींची फसवणूक नोंदवली गेली होती. त्या आधीच्या वर्षी (२०२०-२१) १.५ लाख कोटींची फसवणूत झाली.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये २०२१ आर्थिक वर्षात १०० कोटींहून अधिक फसवणुकीचे प्रकार १६७ वरून ८० वर आले. त्याचबरोबरीने खासगी क्षेत्रात हाच आकडा आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ९८ वरून ३८ वर आला. अशाप्रकारे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये सार्वजनिक बँकिंग क्षेत्रात फसवणुकीचा एकत्रित आकडा ६५,९०० कोटींवरून २८ हजार कोटींवर आला. तसेच खासगी क्षेत्रात २०२२ मध्ये हीच रक्कम ३९,९०० कोटींवरून १३ हजार कोटींवर आली.
बँकांमधून होणारी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ (ईडब्ल्यूएस) फ्रेमवर्क अधिक परिणामकारक करणे, प्रशासनातील भ्रष्ट कारभार प्रतिसाद प्रणाली मजबूत करणे, व्यवहारांच्या देखरेखीसाठी डेटा विश्लेषण वाढवणे आणि मार्केट इंटेलिजेंस (एमआय) युनिट कार्यान्वित करणे यासारखी पावले उचलली आहेत. २०२१-२२ मध्ये रिझर्व्ह बँकेने रिझर्व्ह बँक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. (आरबीआयटी)च्या सहकार्याने शेड्युल्ड बँकांमध्ये ईडब्ल्यूएस फ्रेमवर्क यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यास केला. त्याद्वारे मशीन लर्निंग (एमएल) अल्गोरिदम वापरून निवडक बँकांचे ईडब्ल्यूएसद्वारे मूल्यांकन केले.
२०२२ च्या सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियाने एबीजी शिपयार्ड आणि त्यांच्या प्रवर्तकांनी केलेली २२,८४२ कोटी रुपयांची देशातील सर्वांत मोठी बँक फसवणूक उघड केली. ही फसवणूक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणापेक्षा अधिक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87691 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..