
वांद्रे टर्मिनस ते खार रोड नवीन पादचारी पूल खुला!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.३ : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस ते खार रोड स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता वांद्रे टर्मिनसला उतरणाऱ्या प्रवाशांना उपनगरीय रेल्वे मार्गाच्या खार रोड स्थानकात जाता येणार आहे. त्यामुळे रिक्षासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत. हा पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वेला अंदाजित १४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस ते खार रोड दरम्यानच्या पादचारी पुलासाठी १४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या नव्या पुलाची लांबी ३१४ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे. या पुलाच्या बांधकामात ५१० मेट्रिक टन स्टील, २० मे. टन रिइंफोर्समेंट स्टील आणि २४० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता प्रवाशांना नव्या पादचारी पुलाने खार रोडवरून थेट वांद्रे स्थानकात उतरता येणार आहे. वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक एकच्या उत्तर दिशेकडून खार रोड येथील आणि दक्षिण पादचारी पुलाला हा नवा पादचारी पूल जोडला आहे. पश्चिम रेल्वे चालू आर्थिक वर्षात मुंबई विभागात एकूण सात पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
...
अनेक दिवसांपासूनची मागणी
मुंबईमधील लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीच्या एकूण पाच रेल्वे टर्मिनसपैकी एक वांद्रे टर्मिनस आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील वाढती गर्दी लक्षात घेऊन गर्दीला विभाजित करण्यासाठी ‘वांद्रे टर्मिनस’ १९९० च्या दशकात तयार करण्यात आले होते. प्रामुख्याने पश्चिम रेल्वेवरील गुजरात, राजस्थान आणि उत्तर भारताकडे ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्याचा गाड्या येथून सुटतात. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ अधिक असते. सध्या वांद्रे टर्मिनसला सात प्लॅटफॉर्म आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून पादचारी पूल बांधण्याची मागणी होत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वेने हा पादचारी पूल तयार केला आहे. त्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
...
पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते खार रोड स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी तयार केला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना यापुढे गर्दीचा रस्ता पायी ओलांडण्याची गरज भासणार नाही. तसेच रिक्षासुद्धा घेण्याची गरज भासणार नाही.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
...
टिळक टर्मिनसही जोडा!
रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, पश्चिम रेल्वेने ज्या पद्धतीने वांद्रे टर्मिनस ते खार रोड स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी पूल तयार केला आहे. त्याच पद्धतीने लोकमान्य टिळक टर्मिनस विद्याविहार आणि कुर्ला स्थानकांना पादचारी पुलाने जोडले पाहिजे. काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीमध्ये याची मागणी केली होती. त्यासंदर्भात सर्व प्लॅनसुद्धा तयार करून दिला होता. मात्र यावर मध्य रेल्वे काही दखल घेतली नाही. लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाण्यासाठी प्रवाशांना हार्बर मार्गावरील लोकल किंवा रिक्षा, टॅक्सी मदत घ्यावी लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87702 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..