
खुटल आश्रम शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची मागणी
पालघर, ता. २ (बातमीदार) ः शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा खुटल येथे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात येऊन कला व विज्ञान शाखा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आदिवासी विकास विभागाकडे केली आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत डहाणू प्रकल्पांतर्गत शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा खुटल येथे सद्यस्थितीत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची सुरू आहे. या आश्रम शाळेत ४९५ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता दहावीला उत्तीर्ण झाल्यावर या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यात अडचण भासत आहे. त्यामुळे येथे अकरावी व बारावी वर्गासाठी कला व वाणिज्य शाखा सुरू करण्यात याव्यात जेणेकरून पुढील अभ्यासक्रमासाठी शहरात जाता येत नसल्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे.
दहावीचे शिक्षण झाल्यावर आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मनोर, पालघर किंवा विक्रमगड या ठिकाणी अकरावीसाठी प्रवेश घ्यावा लागतो. आधीच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे हे विद्यार्थी आर्थिक चणचणीमुळे पुढे शिक्षण घेण्याचे टाळतात व पुढील शिक्षणापासून वंचित राहतात. खुटल आश्रम शाळेत शासनातर्फे नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. शाळेच्या मालकीची जागासुद्धा उपलब्ध आहे. या ठिकाणी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध असल्याने लवकरात लवकर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे, जेणेकरून पुढील शिक्षण घेण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. याकरिता आदिवासी विकास विभागाने लवकरात लवकर कला व विज्ञान शाखा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87725 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..