
निसर्गाचे संकेत ओळखल्यास दरडीचा धोका टाळणे शक्य
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ४ : दरड अचानक कोसळत नाही, कोसळण्यापूर्वी निसर्ग काही महत्त्वपूर्ण संकेत देतो, या संकेतांचा अभ्यास, आकलन केल्यास दरडी कोसळण्यापासून होणारी जीवित, वित्तहानी काही प्रमाणात कमी करता येते. रायगड जिल्ह्यात गतवर्षी ९५ नागरिकांचा दरड कोसळून मृत्यू झाला होता. हा धोका सातत्याने वाढत असल्याने रायगडमधील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना दरड साक्षर करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या भूस्खलन निवारण समितीचे सदस्य डॉ. सतीश ठिगळे यांच्या पुढाकाराने ''न्यूटन जागवा; दरडी थोपवा'' अभियान राबविले जात आहे. हे अभियान दरडग्रस्त भागातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे.
डॉ. ठिगळे यांनी गतवर्षी दरडी कोसळलेल्या गावांची पाहणी केली आहे. पर्यावरणावर मानवी अतिक्रमण, अतिवृष्टी आणि भूकंपप्रवणता या नैसर्गिक कारणांबरोबरच डोंगर-उतारांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मानवी अतिक्रमणांमुळे समतोल ढळतो, असे त्यांच्या पाहणीमध्ये आढळून आले.
पर्यावरण जनजागृतीमध्ये पुढाकार घेणाऱ्या भवताल संस्थेच्या वतीने शुक्रवारी चर्चासत्र आयोजित केले होते. यात दरडी कोसळण्याचे संकेत कोणती, याची माहिती देण्यात आली. गतवर्षी ढगफुटीसारख्या पावसाने महापूर, दरडी कोसळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले होते. या घटनांमुळे महाड, पोलादपूर, रोहा, अलिबाग या सारख्या तालुक्यांमधील बाधित होणारी गावे, वाड्यांना सतर्क करण्यासंदर्भातील धडे देण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आला आहे.
दरड कोसळण्यापूर्वीची लक्षणे
- डोंगर उतारांना तडे जाणे
- तडे गेलेला भूभाग खचणे
- घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड
- झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे
- नवीन झरे निर्माण होणे
- घर्षणाने पाण्याचे प्रमाण वाढणे
- जुने झऱ्याचे प्रवाह वाढणे, गढूळ पाणी येणे
- विहिरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87726 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..