
शहापूर तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची शोध मोहीम
खर्डी, ता. ४ (बातमीदार) : रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी कुटुंबांचे प्रमाण शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या कुटुंबांतील मुले शिक्षणापासून वर्षानुवर्षे वंचित राहत असल्याने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यावर्षी २०२२-२३ च्या शैक्षणिक सत्रातील मुख्य प्रवाहात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शहापूरच्या शैक्षणिक विभागाकडून तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यात ‘मिशन झिरो ड्रॉप’ योजनेंतर्गत ८६ विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.
शहापूर तालुक्यातील कचरा वेचणाऱ्या, घरकाम करणाऱ्या व वणवण भटकंती करणाऱ्या कुटुंबांतील ५४ मुले व ३२ मुलींना या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत शाळांमध्ये दाखल केले आहे. या अंतर्गत तालुक्यातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळांतील विद्यार्थ्यांची गळती कायमची बंद व्हावी, हे उद्दिष्ट आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मार्च २०२१ आणि त्याआधीही सर्वेक्षण केले होते; परंतु तरीही काही शाळांच्या कार्यक्षेत्रात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले होते. सततच्या वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि विशेषतः मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. तसेच अपंग मुलांसमोरील आव्हानेही वाढत आहेत.
ग्रामस्थांच्या सहभागाने विशेष नोंदणी मोहीम
शाळाबाह्य मुले आढळून आल्यास गावस्तरीय समिती, पालक आणि ग्रामस्थांच्या सहभागाने विशेष नोंदणी मोहीम राबवून, त्या मुलाला त्याच्या वयानुरूप वर्गात दाखल करण्यात येत आहे. खेड्यापाड्यांतील गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यासोबतच बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, वीटभट्टीचे ठिकाण, दगडखाणी स्थलांतरित कुटुंबे, मागास, वंचित अल्पसंख्याक गटातील वस्त्या तालुक्यातील गावे, वाड्या-वस्त्या व रोजगारासाठी गावोगावी फिरणारे तांडे या ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील शाळाबाह्य ८६ विद्यार्थी कसारा, वालशेत, वासिंद, मांजरे, डोळखांब, लातीफवाडी, दहिगाव, उंबरमाळी, चोंडे, वाफे व गोठेघर येथील आहेत.
---------------------------------- ----------------------------------
शहापूर तालुक्यातील एकही शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू असून, आतापर्यंत ५४ मुले आणि ३२ मुलींना वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिला असून ५ ते २० जुलै २०२२ ला पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे.
- भाऊसाहेब चव्हाण, गट शिक्षणाधिकारी, शहापूर
-----------------------------------------------------------------
तालुक्यात प्रत्येक ठिकाणी शिक्षण विभागाचे प्रतिनिधी येऊन मुलांना शिकण्यासाठी मनधरणी करीत असल्याने आमची मुले कुठेही गेली तरी शिक्षण घेत आहेत.
- राधा हातागळे, पालक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87735 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..