तांत्रिक बिघाडाचा ज्येष्ठ नागरिकांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांत्रिक बिघाडाचा ज्येष्ठ नागरिकांना फटका
तांत्रिक बिघाडाचा ज्येष्ठ नागरिकांना फटका

तांत्रिक बिघाडाचा ज्येष्ठ नागरिकांना फटका

sakal_logo
By

अलिबाग, ता. ३ (बातमीदार) ः एसटीतून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र हाताळणे अडचणीचे होऊ लागले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने हायटेक होत ओळखपत्राच्या जागी स्मार्ट कार्डची सोय केली आहे. या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून स्थानकात येऊन नवीन स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी गर्दी होत आहे. मात्र अलिबाग एसटी आगारात आरक्षण कक्षामधील संगणकात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्याचा फटका स्मार्ट कार्ड नोंदणी व पुनर्नोंदणीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे.
पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करताना, तहसील कार्यालयातील मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे सवलत मिळत होती. त्यानंतर आधार कार्डमार्फत सवलत देण्यास सुरुवात केली; परंतु ही कागदपत्रे हाताळताना गहाळ होण्याची, खराब होण्याची भीती अधिक होती. एसटी महामंडळाने ६५ वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील प्रत्येक बस आगारातील आरक्षण कक्षामध्ये स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्यात आली. स्मार्ट कार्ड नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यांत स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था केली. एसटी महामंडळाच्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. जिल्ह्यातील एसटी बस आगारातील आरक्षण कक्षात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली; परंतु अलिबाग एसटी आगारातील स्मार्ट कार्ड नोंदणी कक्षातील संगणकामध्ये पंधरा दिवसांपासून बिघाड झाला. त्‍यामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी कार्यालय बंद आहे. त्याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत असून स्मार्ट कार्ड नूतन नोंदणी व पुनर्नोंदणीस विलंब होत आहे.

माणगावमधील स्मार्ट कार्ड नोंदणी कार्यालय सुरू
माणगाव बस आगारातील स्मार्ट कार्ड नोंदणी कार्यालयातील संगणकामध्ये बिघाड झाला होता. गेले काही दिवस ही सेवा बंद होती. मात्र एक जुलै रोजी बिघडलेली यंत्रणा दुरुस्त करण्यात आल्‍याने माणगाव बस आगारातील स्मार्ट कार्ड नोंदणी कार्यालय सुरू झाल्‍याची माहिती आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी दिली.

अलिबाग एसटी आगारातील ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी कार्यालयातील संगणकामध्ये बिघाड झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे कामकाज काही दिवसांपासून बंद आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. नवीन संगणकाची मागणी करण्यात आली आहे. संगणक उपलब्ध झाल्यास तातडीने ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87738 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top