
कळंबोली वसाहत जलमय
कळंबोली वसाहत जलमय
महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल
नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर) ः सोमवारी दुपारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे कळंबोली परिसर जलमय झाला. शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून काही बैठ्या घरांमध्येही पाणी शिरण्याचे प्रकार घडले.
जून महिना संपत आला, तरी पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसत नसल्याने नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. सोमवारी दुपारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सायन-पनवेल महामार्गपासूनच कळंबोली वसाहतींमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. या ठिकाणी वाहनचालकांना कसरत करावी लागली.
शहरातील सेक्टर १० गुरुद्वारा परिसर, करावली चौक, सेक्टर ५, साई नगर सोसायटी, सेंट जोसेफ हायस्कूल, परिसर श्यामल मोहन पाटील स्कूल समोरील रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी साचले होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
कळंबोली स्टील मार्केटमधील बाजारसमिती कार्यालय, आरटीओ या ठिकाणी लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. कळंबोली येथे मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. महापालिकेचे कुठल्याही प्रकारचे आपत्ती व्यवस्थापन कळंबोलीमध्ये न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87776 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..