
कल्याणमध्ये दरड कोसळली
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील हनुमान नगर कुष्ठ वसाहत परिसरात सोमवार सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास दरड कोसळल्याने एकच खळबळ माजली. मात्र, या दुर्घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून ५ कुटुंबाना स्थलांतरित करण्यात आले आहे.
कल्याणसहित राज्यातील विविध शहरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वमधील हनुमान नगर, कुष्ठ वसाहत परिसरातील दरड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत जीवित अथवा वित्तहानी न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाने तेथील पाच कुटुंबांना स्थलांतरित केले. त्यातील तीन कुटुंबे नातेवाईकांकडे गेली होती; तर दोन कुटुंबांना राधाकृष्ण मंदिरात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती पालिका सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली आहे.
शेकडो घरांना यापूर्वीच नोटिसा
कल्याण पूर्वमधील मेट्रो मॉलच्या मागील ३३ घरे, वालधुनी शिवाजी नगर ३४ घरे, श्रीकृष्ण नगर, कचोरे ७६ घरे, हनुमान टेकडी १५ अशा धोकादायक ठिकाणच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावण्यात आल्या असून, मुसळधार पावसात नागरिकांच्या मदतीला तेथील समाज मंदिर, शाळा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केल्याची माहिती जे ४ प्रभागाच्या सहायक आयुक्त हेमा मुंबेरकर यांनी दिली.
धोकादायक दरड
कल्याण पूर्वमधील आयडियल इंग्लिश स्कूल, हनुमान टेकडी, काटेमानिवली, कल्याण पूर्व येथील टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या झोपडी, चाळधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या असून, पावसाळ्यात डोंगर माथ्यावरील निखळलेल्या मोठ्या दगडाखालील माती वाहून गेल्यास ते दगड खाली घसरत येऊन लगतच्या झोपड्यांवर, चाळींवर पडून मोठा अपघात, दुर्घटना होऊन जीवित वा वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे.
यापूर्वीच्या घटना
२००९, २०१५ व २०१६ मध्ये पावसाळ्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या होत्या. यामुळे होणारी प्राणहानी व वित्तहानी टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी राहत असलेल्या सर्व घरांना नोटिसा दिल्या असून, नागरिकांनी त्यांचे वास्तव्य अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे व भविष्यात होणाऱ्या जीवित व वित्तहानीपासून बचाव करावा, असे आवाहन केले आहे; मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याचे सोमवारच्या घटनेनंतर पुन्हा समोर आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87859 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..