
महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला केंद्राचा हिरवा कंदील
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ ः नवी मुंबई महापालिकेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या मेडिकल कॉलेजला केंद्रीय आरोग्य विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे कॉलेजच्या उभारणीतील महत्त्वाचा टप्पा गाठण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. मे २०२३ च्या शैक्षणिक सत्रात मेडिकल कॉलेज सुरू करून पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमाची पहिली बॅच सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नात आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास ना हरकत असल्याचे पत्र महापालिकला प्राप्त झाले आहे. मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची परवानगी प्राप्त झाली आहे. नियोजित पीजी मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या टप्प्यात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनॅकोलॉजी व पिडीयाट्रिक अशा पाच शाखा सुरू करण्यात येणार आहेत. आगामी काळात टप्प्याटप्प्याने इतर शाखा सुरू करून एकूण ११ शाखा सुरू करण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. या अनुषंगाने स्वतंत्र जागा शोधून त्याठिकाणी प्रशासकीय व निवासी संकुलाची (हॉस्टेल) व्यवस्था करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. याबाबतच्या कार्यवाहीसाठी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा समावेश आहे.
महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला होता. त्या प्रकल्प अहवालावर सविस्तर चर्चा करून पहिल्या टप्प्यात ५ शाखा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासोबतच मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या प्राप्त करून घेणे आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्धता व साधनसामुग्री व्यवस्था करणे याबाबत एकाचवेळी समांतरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडे मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत मान्यता देण्यासाठी पालिकेतर्फे पाठपुरावा सुरु होता. अशाच प्रकारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडेही वैद्यकीय महाविद्यालय नोंदणीची कार्यवाही गतिमानतेने करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
आरोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार
पहिल्या टप्प्यात नवी मुंबई महापालिकेच्या वाशी व नेरूळ या रुग्णालयात मेडिसीन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, गायनाकोलॉजी व पिडियाट्रीक अशा ५ शाखा सुरू करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल. याद्वारे महापालिका रुग्णालयात सर्जिकल इन्टेसिव्ह केअर, मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडियाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87918 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..