ठाणे जिल्ह्यात गरोदर व स्तनदा मातांसह बालकांना आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्ह्यात गरोदर व स्तनदा मातांसह बालकांना आधार
ठाणे जिल्ह्यात गरोदर व स्तनदा मातांसह बालकांना आधार

ठाणे जिल्ह्यात गरोदर व स्तनदा मातांसह बालकांना आधार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ :
शैक्षणिक क्षेत्रासह बँकेत खाते उघडणे, तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अशातच पाच वर्षांखालील बालकांसाठीही आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे, तर गरोदर आणि स्तनदा मातांना दिल्‍या जाणाऱ्या पोषण आहाराची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठीही लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी असणे गरजेचे आहे. त्यानुसार नवजात बालकांसह गरोदर आणि स्तनदा मातांची २१३ आधार केंद्रांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.
शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आधार कार्ड नसलेल्यांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून शिबिराचे आयोजनदेखील करण्यात येते. अशातच आधार कार्ड बनवणारी संस्था यूआयडीएआयने आता नवजात बालकांच्या जन्मावेळी रुग्णालयात आधार नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करण्यात येत नव्हते. कारण, वयानुसार बायोमेट्रिक बदल होत असतात; परंतु आता नवजात बालकाला जन्मावेळी आधार नोंदणी मिळणार आहे.
ठाणे जिल्ह्यात या कामाला मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरुवात झाली असून या नोंदणीसाठी जिल्ह्यात २१३ आधार कार्ड केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये टपाल कार्यालयाची १८६, तर महिला बालविकास विभागामार्फत २७ केंद्रांचा समावेश आहे. यात ठाणे जिल्ह्यात नवजात बालकांसह या लाभार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम करण्यात येत आहे. १ ते १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील एक ते दीड लाख लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली.
--
का हवी आधार नोंदणी
ठाणे जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागामार्फत १,८९४ अंगणवाड्या सुरू आहेत. या अंगणवाड्यांद्वारे दीड लाख बालकांसह गरोदर महिला, तसेच स्तनदा मातांना पोषण आहार देण्यात येतो. वाटप करण्यात येणाऱ्या या पोषण आहाराची माहिती अद्ययावत राहावी, तसेच योग्य लाभार्थीला आहार मिळतो का हे पाहण्यासाठी लाभार्थ्यांची आधार नोंदणी करणे बंधनकारक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87922 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top