
‘अतिसार’ रोखण्यासाठी पालघर सज्ज
पालघर, ता. ६ (बातमीदार) ः पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात साथीचे आजार सुरू होऊन अनेक बालके आजारी पडतात, तर काहींचा मृत्यूही होतो. यासाठी खबरदारी म्हणून शून्य ते पाच वयोगटातील एक लाख ८० हजार ४४४ बालकांसाठी पालघर जिल्ह्याच्या संपूर्ण आठही तालुक्यांत १ ते १५ जुलै दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाने आशा वर्करपासून आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन या अभियानाची सुरुवात केली आहे.
जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसांत अतिसारामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर पोहोचवण्याच्या दृष्टीने या अभियानांतर्गत ध्येय ठरविण्यात आले आहे. या अभियानामध्ये शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांद्वारे उपचार करण्यासाठी आशा वर्कर यांच्यावर जबाबदारी दिली आहे व त्यावर स्वनियंत्रणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक गटप्रवर्तक यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
असे सुरू आहे काम
आशा वर्करनी आपल्या क्षेत्रात जाऊन शून्य ते पाच वयोगटातील बालकांच्या पाच कुटुंबांचा एक गट तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये अतिसार झालेल्या बालकांना ओआरएस आणि झिंकचे वाटप करून त्यांच्या ठरवून दिलेल्या डोसची अंमलबजावणी होते की नाही याबाबतची काळजी घेतली जाणार आहे. अतिसाराचा प्रतिबंध नियंत्रण करण्याकरता प्रचार, प्रसार व संवाद या बाबींवर भर देण्यात येत आहे. शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, आरोग्य सेविका कार्यकर्ते नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, वीटभट्टी कामगार, स्थलांतरित मजूर अशा जोखीमग्रस्त घटकांवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत अतिसाराची साथ असलेले क्षेत्र व पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
सुकाणू समिती
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील अतिसारामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने हे अभियान राबविण्यात येत आहे. ज्या कुटुंबामध्ये अतिसाराची लागण झाली असेल त्या कुटुंबांतील नागरिकांनी तातडीने आशा वर्कर यांना माहिती द्यावी. तसेच त्यांनी दिलेली औषधे बालकांना पाजत राहावे, अथवा गावातील उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्रांत बालकांना दाखल करून उपचार करून घ्यावेत.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर जिल्हा परिषद
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87986 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..