
नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आलेख घसरला
वाशी, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना आकडेवारीचा आकडाही मागील आठवड्यात सरासरी ४०० च्या सुमारास होता, पण आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असल्याचे दिसून येत आहे.
दहा दिवसांपूर्वी शहरात एक हजार ९६८ उपचाराधीन रुग्ण होते. आता या संख्येत घट झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या ही ९५६ पर्यंत खाली आली आहे. त्यातच कोरोना रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर दैनंदिन रुग्णसंख्याही घटली असून १५० पेक्षा कमी होऊ लागली आहे. चौथ्या लाटेमध्ये कोरोना रुग्ण संख्येच्या आलेखामध्ये चढ-उतार होत असल्याचे निर्दशनास येत आहे, पण सद्यःस्थितीत कोरोना रुग्ण आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
२५ मेपूर्वी शहरात कोरोना रुग्णसंख्या एक अंकी होती. त्यात झपाट्याने वाढ होत ती चारशेपेक्षा अधिक झाली होती. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सुधारण्याबरोबरच कोरोना चाचणी व लसीकरणावर भर देण्यात आला आहे. कोरोना रुग्णसंख्या पुन्हा घटत असल्यामुळे मुखपट्टीचा वापर नागरिकांकडून पूर्णत: बंद करण्यात आला आहे. त्यातच कोरोनानंतर कोणत्याही प्रकारांचा रुग्णांना जास्त त्रास होत नसल्यामुळे ६७६ रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले.
तिसऱ्या लाटेनंतर दोन मृत्युमुखी
नवी मुंबई महापालिका हद्दीतील जवळपास सर्व नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आहे. जवळपास तिसरी लाट संपलेली असताना कोरोनाने नवी मुंबईत २,०४९ रुग्ण दगावले होते. पण त्यानंतर फक्त दोनच जण कोरोनामुळे दगावले असल्याचे दिसून येत आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. रुग्णांना अतिदक्षता खाटांची आवश्यकता भासत नाही. मात्र नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
- संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88009 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..