
हिंदमाता परिसराने घेतला मोकळा श्वास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील हमखास पाणी साचणारा भाग असलेल्या हिंदमाता परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पाणी न साचल्याने येथील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी तुंबणाऱ्या पाण्यापासून यंदाच्या वर्षी दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया येथील व्यापारी वर्गाने व्यक्त केली.
आमचे तीन पिढ्यांपासून हिंदमाता येथे साड्यांचे दुकान आहे. माझ्या वडिलांनी हा खाडी परिसर ते हिंदमाता फ्लायओव्हर हा सगळा परिवर्तनाचा काळ पाहिला आहे. सखल भाग असल्याने येथे सर्व भागातून पाणी यायचे. अगदी गेल्या वर्षीपर्यंतही आम्ही याठिकाणी सरासरी तीन ते चार फूट इतके पाणी साचल्याचे अनुभवले. या पाण्यामुळेच आमच्या दुकानातील एक खणही आम्ही रिकामा ठेवायचो. पण यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. यंदाच्या वर्षी आम्हाला या जलमय परिस्थितीतून दिलासा मिळाल्याचे मत हरिश शाह या साडी व्यापाऱ्याने व्यक्त केले; तर अन्य एका साडी व्यापाऱ्यानेही असेच मत व्यक्त करत नुकसान टळल्याचे म्हटले.
हिंदमाता परिसरात सिग्नलच्या ठिकाणी दुकान असणारे महेंद्र तांबे म्हणाले की, येथे दरवर्षी पावसामुळे झालेले नुकसान आम्ही पाहिले आहे. येथे १२ ते १६ तास पाणी उतरत नाही, पण गेल्या दोन दिवसांमध्ये मात्र पावसाचे पाणी येथे शिरलेले नाही. त्यामुळेच मुंबई पालिकेने केलेली उपाययोजना ही खरोखर यशस्वी ठरल्याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.
मुंबईत गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदार बॅटिंग केली आहे. हिंदमाता परिसरात मंगळवारी १०७ मिमी पाऊस झाला. पण हे पावसाचे पाणी उपसा केल्यानेच याठिकाणी पाणी साचले नसल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली. सध्या हिंदमाता परिसरातील उपसा केलेले पाणी साठवण्यासाठी पालिकेने परळच्या सेंट झेव्हीयर्स मैदानात २ कोटी लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून दादर पश्चिमेला प्रमोद महाजन मैदानात पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी याठिकाणी साठवून नंतर ते ओहोटीवेळी समुद्रात सोडण्यात येते.
सध्याची प्रमोद महाजन उद्यानातील पाणी साठवण्याच्या टाकीची क्षमता वाढ तिप्पट होणे अपेक्षित आहे. त्यासाठी रेल्वेच्या परवानगीने पावसाळ्यानंतर हे काम करण्यात येईल. रेल्वेच्या मार्गाखालून ही पाण्याची पाईपलाईन जात असल्याने अधिक सुरक्षितपणे काम करणे गरजेचे आहे.
- पी वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), पालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88080 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..