
छत्री खरेदीसाठी विद्यार्थ्यांना रोख रक्कम
मुंबई, ता. ६ : पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदा छत्री खरेदीसाठी रोख रक्कम देण्यात येणार असून शालेय वस्तू वाटपातील पहिले डायरेक्ट बेनिफिशिअरी ट्रान्सफर (डीबीटी) यंदा अमलात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांना ही रोख रक्कम हस्तांतरित करून ती शालेय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. छत्रीसाठी पालिकेतर्फे विद्यार्थ्यांना २७० रुपये देण्यात येतील. त्याची सुरुवात बुधवारपासून झाली.
अनेक मुख्याध्यापकांच्या खात्यात ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा झाली आहे. त्यामुळे ही रक्कम जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध होईल, अशी माहिती पालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. पालिकेत अनेक विद्यार्थ्यांकडे बॅंक खाती नसल्यानेच ही रक्कम मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. शालेय वस्तूंच्या वाटपामध्ये छत्री ही वस्तू थेट न देता त्यासाठीचे पैसे देण्याचा डीबीटीचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे वेळेत विद्यार्थ्यांना छत्र्या उपलब्ध होतील, असा विश्वास पालिकेचे शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षासाठी शालोपयोगी वस्तू-वह्या, रेनकोट व स्टेशनरीच्या निविदा प्रक्रिया पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यांमार्फत पूर्ण झाल्या आहेत. तसेच कंत्राटदारास खरेदी आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून शाळांमध्ये पुरवठा सुरू करून विद्यार्थ्यांना हे साहित्य उपलब्ध होईल. गणवेश, शूज, सॉक्स, सॅंडल आणि स्कूल किट देण्याच्या निविदा प्रक्रिया मध्यवर्ती खरेदी खाते राबवत असून निविदा अंतिम टप्प्यात आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88084 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..