
अभूतपूर्व कोंडी सुटता सुटेना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाण्यातील तीनहात नाका येथून सकाळी ८ च्या सुमारास नाशिकच्या दिशेने निघालो; परंतु सकाळी साडेदहा झाले तरी साकेत पुलावरच. म्हणजे दोन ते तीन किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ लागल्याचे एका कारचालकाने आज सांगितले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ठाण्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर दिवसभर हे वाहतूक कोंडीचे चित्र आहे. दिवसभर होणारी अवजड वाहनांची वाहतूक, त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, बेशिस्त चालक यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा गेल्या काही दिवसांत पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिस रस्त्यावर असले, तरी ते केवळ शोभेपुरताच, अशी ओरड वाहनचालकांकडून केली जाते.
ठाण्यातील घोडबंदर रोड, भिवंडी-नाशिक रोडवर सकाळ-सायंकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. शहरातील सेवा रस्त्यावरही कोंडी कायम असते. या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा फटका स्कूल बससह रुग्णवाहिका आणि नोकरदार वर्गालाही बसत आहे. १० मिनिटाचे अंतर कापण्यासाठी एक-दोन तासांचा अवधी लागतो. गेल्या वर्षीही हेच चित्र होते, आता कुठे पाऊस सुरू झालेला असताना, पुढे उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेशिस्त वाहनचालक आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीला ब्रेक लागत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे
खड्डे बुजवले, त्राय कायम
मुसळधार पावसामुळे महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सलग दोन दिवस झोडपून काढल्यानंतर शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. सकाळी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतल्याने मुंबई-नाशिक महामार्गासह घोडबंदर रोडवर कोंडी झाली होती. या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या कोंडीने अक्षरशः हैराण झाल्याच्या व्यथा वाहनचालकांनी मांडल्या.
पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. पाऊस थांबल्यानंतर हे खड्डे बुजविण्याचे काम गुरुवारी रात्री हाती घेतले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. शहरातील सिग्नल यंत्रणा बंद ठेवून पोलिस कर्मचारी चौकाचौकात तैनात केले आहेत. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- डी. कांबळे, उपायुक्त, (प्रभारी) वाहतूक शाखा, ठाणे
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88281 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..