सरकार बदलल्याने सुनावण्यांचे काय होईल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकार बदलल्याने सुनावण्यांचे काय होईल?
सरकार बदलल्याने सुनावण्यांचे काय होईल?

सरकार बदलल्याने सुनावण्यांचे काय होईल?

sakal_logo
By

सरकार बदलल्याने सुनावण्यांचे काय होईल?
प्रश्न ः जुन्या सरकारमधील सहकार मंत्र्यांकडे आमच्या सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या एका पुनर्रीक्षण अर्जावर सुनावणी झाली होती. त्यात अंतरिम आदेशही देण्यात आला होता व मुख्य सुनावणी जुलैअखेर ठेवण्यात आली आहे. आता सरकार बदलल्यानंतर मंत्र्यांचे अंतरिम आदेश व सुनावणी यांचे भवितव्य काय, याबाबत माहिती द्यावी.
- प्रथमेश खिल्लारे, मालाड
उत्तर ः सहकार खात्याच्या मंत्र्यांकडे होणाऱ्या सुनावण्या या अर्धन्यायिक प्रक्रियेचा भाग असतात. त्यामुळे सहकार मंत्र्यांनी दिलेले अंतरिम आदेश हे जसे आहेत तसेच लागू होणार आहेत. सरकार व मंत्री यांच्यात बदल झाल्यामुळे अंतरिम आदेशाची गुणवत्ता, त्यांचा कायदेशीरपणा व त्याची अंमलबजावणी यात कोणतीही अडचण येणार नाही. अंतिम सुनावणीची जी तारीख आहे त्या दिवशी नव्या सरकारचे जे सहकार खात्याचे मंत्री असतील त्यांच्यासमोर ते प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात येईल व त्या प्रकरणावर नियमित सुनावणी होईल. या नव्या मंत्रिमहोदयांना नव्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याप्रमाणेच जुन्या प्रकरणांवरही सुनावण्या घेऊन आदेश देण्याचे अधिकार आहेत. पूर्वीच्या मंत्र्यांनी दोन्ही पक्षकारांचे ऐकून, कागदपत्रांची तपासणी करून गुणवत्तेवर जे अंतरिम आदेश दिले होते, ते अंतरिम आदेश, अंतिम आदेशापर्यंत सुरू राहतील. अंतिम आदेश देताना यापूर्वी दिलेले अंतरिम आदेश कायम करण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार सहकार मंत्र्यांना आहेत.

प्रश्न ः माझ्या वडिलांनी नॉमिनेशन करून आईला त्यांची नॉमिनी केले. माझे वडील सन २००० मध्ये मरण पावले. आम्हा चार भावंडांपैकी तीन भावंडे त्यांच्या घरी राहतात. मी आई-वडिलांसोबत होतो व आहे. आईला संस्थेने २००१ मध्ये सभासद केले. आईने २००३ मध्ये माझ्या नावे नॉमिनेशन केले. संस्थेने त्याची नोंद त्यांच्या कागदपत्रांमध्ये घेतली. आई सन २०२१ मध्ये मरण पावल्यावर संस्थेने मला सभासद केले आहे. माझ्या इतर भावंडांनी माझ्याविरुद्ध न्यायालयामध्ये याचिका दाखल करून तेदेखील माझ्या आई-वडिलांचे वारस आहेत, असे जाहीर करावे व मी राहत असलेल्या सदनिकेमध्ये त्यांचा वारसा हक्क आहे असे जाहीर करावे अशी मागणी केली. तसेच त्यांनी निबंधक कार्यालयामध्ये अर्ज दाखल करून माझे सभासदत्व रद्द करावे असा अर्ज दाखल केला आहे, याबाबत मार्गदर्शन करावे.
- मिलिंद टेंबे, कांजूरमार्ग

उत्तर ः संस्थेमध्ये तुमच्या कुटुंबातील आजपर्यंत झालेले नॉमिनेशन योग्य व कायदेशीर आहे. सन २०१९ पूर्वी नॉमिनेशन ही कायदा क्रमांक ३० अन्वये करण्यात येत होती. तेव्हा नामनिर्देशित व्यक्तीने पुन्हा वारसाच्या नावे नामनिर्देशन करण्याबाबत कोणतीही अडचण नव्हती, परंतु आता झालेल्या कायद्यामधील बदलामुळे यात संदिग्धता आली आहे. वडिलांच्या पश्चात आईच्या नावाने नॉमिनेशनद्वारे झालेले सभासदत्वाचे बदल हे योग्य व कायदेशीर आहेत. तसेच आपल्या आईने सन २००३ मध्ये केलेले नॉमिनेशनदेखील त्या वेळच्या प्रचलित कायद्यानुसार आहेत. आपली आई सन २०२१ मध्ये वारल्यानंतर संस्थेने त्यांच्या दप्तरी आलेल्या कागदपत्रांच्या आधारे केलेले सभासदत्वातील बदल हेदेखील सध्या अस्तित्वात आलेल्या कायद्यानुसार आहेत. संस्थेने आपल्या आईच्या पश्चात सभासदत्व आपल्या नावे करण्याच्या कृतीवर कायदेशीर आक्षेप घेणे योग्य नाही. निबंधकांकडे आपण या सर्व बाबींचा तारखेप्रमाणे तपशील द्यावा व सध्या प्रचलित असलेले कायदेही पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होत नाहीत हे निबंधक कार्यालयाच्या निदर्शनास आणावे. आपल्या भावंडांनी न्यायालयांमध्ये केलेले अर्ज हे त्यांचे कायदेशीर अधिकार व त्याचे रक्षण करण्यासाठी केलेले आहेत. उच्च न्यायालय त्यांच्यासोबत तुम्हालादेखील तुमच्या आई-वडिलांचे वारस आहात हे जाहीर करणार आहे. सबब, तुमचे हक्कदेखील अबाधित राहणार आहेत. आपल्या भावंडांनी केलेल्या निबंधक कार्यालयातील अर्ज हा अयोग्य व गैरलागू आहे. निबंधक कार्यालय कायद्याच्या कक्षेतच याप्रकरणी निकाल देईल, अशी आशा करण्यास वाव आहे; अन्यथा निबंधक कार्यालयातील आदेश अयोग्य असल्यास तुम्ही त्यास योग्य न्यायालयात आव्हान देऊ शकता.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत-Sharadchandra.desai@yahoo.in

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88304 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top