उपजीविकेचे साधन म्‍हणजे जीवन नव्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपजीविकेचे साधन म्‍हणजे जीवन नव्हे
उपजीविकेचे साधन म्‍हणजे जीवन नव्हे

उपजीविकेचे साधन म्‍हणजे जीवन नव्हे

sakal_logo
By

विक्रम गायकवाड, नवी मुंबई
पोलिसांचे दैनंदिन जीवन म्हणजे सतत कामाचा व्याप; मात्र व्यग्र व धावपळीच्या स्‍थितीतही काही जण आपल्‍या आवडी-निवडी, छंद आवर्जून जोपासतात. त्‍यापैकी एक नवी मुंबई पोलिस दलात विशेष शाखेच्या प्रमुख असलेल्या उपआयुक्‍त रूपाली अंबुरे. त्‍यांना गाण्याचा, नृत्याचा, काव्यलेखनाचा तसेच ट्रेकिंगचा छंद आहे. आपले दैनंदिन कर्तव्य सांभाळत त्‍यांनी आपले कलागुण जपले असून त्‍यात प्रावीण्यही मिळवले आहे.
आजच्या स्‍पर्धात्‍मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्‍येकालाच कसरत करावी लागते. थोडं थांबून, आयुष्य जगायला, छोटे-छोटे क्षण अनुभवायला कुणाकडे उसंतच नाही. पोलिस दलात तर कामाचा प्रचंड ताण असतो. पोलिस विभाग असो की इतर कोणतीही नोकरी, ती आपली उपजीविका आहे, आपले सगळे जीवन नाही. त्यामुळे स्‍वच्छंद जीवन जगायचे असेल, तर अडचणींचा पाढा न वाचता, आयुष्याचा योग्य समतोल साधता आला पाहिजे, असा सल्‍ला अंबुरे देतात.
रूपाली अंबुरे गेली १८ वर्षे पोलिस दलात काम करीत आहेत. तत्‍पूर्वी त्यांनी एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून दीड वर्ष काम केले आहे. पोलिस दलात भरती झाल्‍यावर अमरावती, जळगाव, नाशिक, मुंबई, ठाणे या ठिकाणी काम केल्‍यावर सध्या त्‍या नवी मुंबईत कार्यरत आहेत. कामाबरोबरच आपली कला जोपासण्यात त्‍यांचा हातखंडा आहे. अंबुरे छोटेखानी गझलचे, मराठी-हिंदी गाण्यांचे, काव्य लेखन-वाचनाचे कार्यक्रम करतात. त्‍यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून नेहमीच भरभरून दाद मिळते. त्‍यांना नृत्‍याचीही आवड आहे.
सुदृढ आरोग्‍य म्‍हणून चिरतरुण राहण्याची गुरुकिल्‍ली असल्‍याने त्‍यांचा शारीरिक स्‍वास्‍य‍थ उत्तम ठेवण्यावर विशेष भर आहे. त्‍यासाठी त्‍या दररोज पहाटे दोन-अडीच तास व्यायामासाठी राखून ठेवतात. ट्रेकिंगमध्येही त्‍यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग असतो. आपले छंद, आवडी-निवडी जोपासल्‍यामुळे जगण्याची नवी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे कोणतेही काम आव्हान म्हणून स्‍वीकारण्याचे बळ मिळत असल्याचे अंबुरे सांगतात.

आपल्या आयुष्यावर पहिला हक्क आपला आहे. म्हणून स्वत:साठी, स्वत:च्या आवडीसाठी प्रत्‍येकानेच वेळ काढायला हवा. कारण तुम्ही आनंदी नसाल तर इतरांना आनंद देऊ शकणार नाही. त्यामुळे मला आवडणाऱ्या गोष्टींसाठी ठरवून वेळ काढते. माझ्यासाठी संगीत हे थेरपीप्रमाणे आहे. ज्याच्या आयुष्यात संगीत आहे, त्याला कधीच नैराश्‍य नाही. संगीताचा रियाझ करताना ब्रह्मांडाशी, चराचराशी दृढ नाते तयार होते.
- रूपाली अंबुरे, उपआयुक्‍त

महिला सुरक्षेसाठी उपक्रम
पोलिस उपआयुक्त रूपाली अंबुरे यांचा जन्म व शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांनी बी.ई. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले असून २००५ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात त्या दाखल झाल्या. २००६ मध्ये त्यांना अमरावती ग्रामीण जिल्‍ह्यात डीवायएसपी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली. २००७ ते २०१० मध्ये जळगावमध्ये कार्यरत असताना त्यांनी सायबर गुन्हा उघडकीस आणून नायजेरियन नागरिक असलेल्या आरोपीला अटक केली होती. त्यानंतर २०११ ते १४ या कालावधीत नाशिकमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे हाताळून आपल्या कामाचा ठसा उमटवला. २०१४ मध्ये त्यांना उपआयुक्त म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेच्या सेंट्रल झोनची जबाबदारी संभाळत प्रवाशांच्या विशेषत: महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून रेल्वे पोलिसिंगचे रूप बदलले.

पुरस्‍काराने गौरव
रूपाली अंबुरे यांनी पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना २०१० मध्ये स्टार रिपोर्टच्या वतीने वूमन अचिव्हर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. २०१३ मध्ये नाशिक येथे सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते तेजस्विनी पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय २०१४ मध्ये त्यांचा एमएएसए सन्मान पुरस्काराने तसेच डीडी सह्याद्री चॅनलच्या वतीने प्रेरणा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. अंबुरे यांनी हिंदी-मराठी गाण्यांच्या अनेक कार्यक्रमांतून आपली कला सादर केली आहे. त्यांच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88322 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..