
ठाणे जिल्ह्यात पिकासाठी महसूल मंडळ अधिसूचित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२२ करिता या योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात भात पिकाकरीता अधिसूचित ४१ महसूल मंडळांमध्ये; तर नाचणी पिकाकरिता अधिसूचित १७ महसूल मंडळांमध्ये ही योजना लागू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दिली.
ठाणे जिल्ह्याकरिता सरकारकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. योजनेत सहभागी शेतकऱ्यांना हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी न होणे, पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वादळ, चक्रीवादळ, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरिता विमा संरक्षण लाभणार आहे. या योजना कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारचे अधिकृत संकेतस्थळ pmfby.gov.in किंवा संबंधित कंपनीचे संकेतस्थळ यावरूनही ऑनलाईन अर्ज करता येईल. पिकासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार, पीक लागवड नोंदणी प्रमाणपत्र, शेतकऱ्यांनी सात-बारा उतारा, आधार क्रमांक संलग्न बँक खात्याचे तपशील सोबत जोडणे आवश्यक आहे.
पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक
शेतकरी बांधव सरकारच्या पीक विमा संकेतस्थळावरून विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून, नजीकच्या सेतू केंद्रातून वैयक्तिकरीत्याही योजनेत सहभागी होऊ शकतात. यंदाच्या खरीप हंगामात भात व नागली लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेतल्यानंतर ई-पीक पाहणी अॅपद्वारे पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88341 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..