
पेशवेकाळापासून आषाढीची उत्सव
सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ९ ः समचरणीदृष्टी विटेवरी साजिरी.. तेथें माझी हरी वृत्ती राहो..आणीक न लगे मायिक पदार्थ.. तेथें माझें आर्त नको देवा..संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओवी. पनवेलमधील वडाच्या पाराखालचे पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाहिल्यावर आजही भाविकांच्या आपसूकच ओठावर या ओवी येतात. अवघ्या पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणारे मंदिर हजारो वर्षांची आषाढी एकादशीची परंपरा आजही कायम ठेवून आहे.
पेशव्यांनी वसवलेल्या पनवेल शहराचे इतिहासातील महत्त्व विविध वास्तू आणि इतिहासातील घटनांमधून आजही अधोरेखित होते. पनवेलच्या वडाळे तलावाशेजारी वसलेले विठ्ठल रखुमाई मंदिर समृद्ध इतिहासाची साक्ष देणारे आहे. उपलब्ध माहितीनुसार, पुरातन काळात रोडे बुवांनी मंदिराची स्थापना केली. २४ फेब्रुवारी १९१९ ला नामदेव शिंपी समाजाला रोडे बुवा यांनी हे देऊळ सुपूर्द केले. मंदिर परिसरात असणारे वडाच्या झाडाखालचा बाजार आजही पनवेलमध्ये प्रसिद्ध आहे. बाजारात मंदिराजवळ बसून संत तुकाराम महाराज मिरची आणि इतर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत असे, जुने जाणते सांगतात. व्यवसायाची वेळ संपली की, संध्याकाळी ते येथेच पारायण करीत.
तुकाराम पारायणात एवढे मग्न होऊन जात की, त्यांच्या दुकानातून कोण काय वस्तू घेऊन जायचे. याचा ठावही त्यांना नसायचे. पुढे या मंदिरावर १९५२ ला नामदेव शिंपी समाजाने ट्रस्टची स्थापना केली. आत्माराम नारायण नाझरे, पंढरीनाथ दयाजी मुळे हे त्या काळचे विश्वस्त होते.
मंदिराच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत न चुकता आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला अभिषेक घालून दागिन्यांनी सजवले जाते. नंतर दिवसभर भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम सुरू असतात. देवळात गोकुळाष्टमीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा होतो. मंदिरात नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तुकाराम महाराज वडाच्या झाडाखाली व्यापार करायचे, ही आख्यायिका प्रसिद्ध असल्याने पनवेल महापालिकेने येथे ज्येष्ठ शिल्पकार अरुणबुवा कारेकर यांनी तुकाराम महाराजांचे मिचरी विक्री करतानाचे एक शिल्प साकारले आहे. तर देवळातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती काळ्या पाषणात घडवलेल्या उत्कृष्ट कलेचा नमुना आहे. या मूर्ती अति प्राचीन असून पूर्वीपासून जशाच्या तशाच आहेत.
आषाढीला देवांच्या डोक्यावर चांदीचा मुखवटा, दागिने चढवले जातात. दरवर्षी एकादशीला गुजराती समाजाचे नागरिकही दर्शनासाठी गर्दी करतात.
मंदिर पुरातन असून पनवेल आणि शेजारच्या परिसरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. ज्या लोकांना वारीला जाता येत नाही, असे लोक त्या मंदिरात येतात. भजन व कीर्तन करतात.
- विनायक आत्माराम नाझरे, अध्यक्ष, नामदेव-शिंपी समाज,पनवेल,
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88406 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..