
शहापूर तालुक्यात यंत्राद्वारे भात शेती लागवड
खर्डी, ता. १० (बातमीदार) : भातपिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागामार्फत मासवण, वेडवहाळ व चोंढे या गावात १०० एकर जमिनीत ‘कर्जत ३’ या वाणाची ‘एक गाव एक वाण’ या धर्तीवर यांत्रिकी पद्धतीने दप्तरी भाताची लागवड करण्यात येत आहे. वाफ्यावर रोप तयार करून शास्त्रोक्त रीतीने रोपांची मांडणी करत या शेतीचे नियोजन केले जात आहे. पारंपरिक शेतीपेक्षा या नव्या पद्धतीमुळे एकरी पाचशे ते हजार किलो जादा भात पीक मिळून शेतकऱ्यांच्या खर्चात कपात होणार असून, आर्थिक फायदा व उत्पन्नात वाढ होणार असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शहापूर तालुका आदिवासी बहुलभाग म्हणून ओळखला जातो. पावसाळा सोडला तर या ठिकाणी अनेक भागात पाण्यासाठी ग्रामस्थांना ओढाताण करावी लागते. येथील शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून, पावसाळ्यात भातशेतीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, आजच्या महागाईच्या काळात भातशेती करणे परवडत नसल्याने जमिनी तशाच पडून असतात. शेतीसाठी कामगार शोधणे, त्यांची मजुरी, वेळ या सर्वांचा खर्च जास्त व उत्पन्न कमी, असे होत असल्याने मेहनत वाया जात होती.
योजनेचे प्रशिक्षण
तालुक्यातील मासवण या गावातील शेतकऱ्यांना मे महिन्यात या योजनेची माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले होते. जमीन निवड, मातीचे परीक्षण, वाणाची निवड शेतीसाठी ड्रम सिडरणे अथवा टोकण पद्धतीने भात लागवड, मॅट नर्सरीवर रोपे तयार करणे, यंत्राच्या साहाय्याने भात लागवड, ट्रे मध्ये रोपे तयार करणे आदींची माहिती या दरम्यान कृषीतज्ज्ञ पंकज विशे व खर्डीचे कृषी अधिकारी रविंद्र घुडे यांनी दिली होती.
----------------------- ---------------------------------------------
कोट
भातशेतीला चालना मिळावी यासाठी कृषी विभागाने प्रायोगिक तत्वावर ‘एक गाव एक वाण’ या धर्तीवर तालुक्यात भात लागवडीचा उपक्रम प्रथमच सुरू केला असून, शेतकऱ्यांना कमी खर्च व मेहनतीने जास्त उत्पन्न मिळणार आहे.
अमोल आगवण, तालुका कृषी अधिकारी, शहापूर.
---------------------------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88408 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..