
कल्याणमधील गणेश मूर्ती आफ्रिकेला रवाना
कल्याण, ता. १० (बातमीदार) : गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्र नव्हे, देशात नव्हे तर आता जगाच्या पाठीवर साजरा करण्यात येत असून, कल्याणमधील एका गणेश मूर्तिकाराने यंदा गणेशमूर्ती चक्क आफ्रिकामधील नायजेरिया शहरात रवाना केली आहे.
कल्याण पडघा रोडवरील बापगावमध्ये राहणारे मूर्तिकार नीलेश नखाते यांचा कल्याणमधील वायले नगरमध्ये अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती बनवण्याचा कारखाना आहे. कला केंद्राच्या माध्यमातून कला जोपासण्याचे काम नीलेश मागील नऊ वर्षांपासून करत आहे. कोरोना आणि त्यानंतर पीओपीवर बंदी आल्याने दरवर्षी केवळ शाडूच्या १०० मूर्ती घडवतात, परंतु कमी वेळेत जास्त मूर्ती तयार करणे शक्य नसल्याने ते पेण, पनवेल, कल्याण, अंबरनाथ शहरातून काही गणेशमूर्ती मागवतात. त्यांची कला पाहून शहरात गणेशमूर्तीची मागणी वाढत असताना आता परदेशातूनही मागणी वाढली आहे.
मागील वर्षी एका भक्ताने गणेशमूर्ती लंडनमधील घरी नेली होती. या वर्षी नीलेश नखाते यांच्या कला केंद्रातील एक गणेशमूर्ती शुक्रवारी आफ्रिकेला पाठवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या कला केंद्रातून एक मूर्ती लंडन, एक सुबक गणेशमूर्ती आफ्रिकामधील नायजेरिया शहरात पाठवण्यात आली होती. कल्याणमधील गांधारी परिसरामध्ये राहणाऱ्या एका गणेशभक्ताने नखाते यांच्या कला केंद्रास भेट देत एक फुटाची गणेशमूर्ती बनवण्यास सांगितले होते. ते गणेशभक्त कामानिमित्त आफ्रिकेत राहत असून, तेथे ते गणेशोत्सव साजरा करणार आहेत. नखाते यांनी त्यांची मूर्ती शुक्रवारी पार्सल करून त्यांना पाठवली आहे.
कोट
आपल्या हातून घडलेली गणेशमूर्ती परदेशात गेल्याबाबत आनंद आहे. तेथे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना चांगली मागणी असून, आपण घडवलेल्या मूर्तीला परदेशातून मागणी येत असल्यामुळे आनंद आहे.
नीलेश नखाते, मूर्तिकार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88411 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..