
निवासी डॉक्टरांचा पगार रखडला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : शासकीय रुग्णालयात रात्रंदिवस रुग्णांची सेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय भरता येत नाही. निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने डॉक्टरांची ही व्यथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मांडली; तर डॉ. म्हैसेकर यांनी निवासी डॉक्टरांशी झालेल्या चर्चेला दुजोरा देत डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींनी निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांबाबत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान मार्डने सरकारकडे प्रलंबित असलेल्या आपल्या जुन्या मागण्यांकडेही लक्ष वेधले आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. धनराज गित्ते, डॉ. संगमेश्वर महाजन व इतर सहकारी उपस्थित होते.
याशिवाय सर्व सरकारी आणि पालिका रुग्णालयांचे विश्लेषण करण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे. याशिवाय, वरिष्ठ डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा आग्रह निवासी डॉक्टरांनी धरला आहे. जेणेकरून शासनाच्या डॉक्टरांचे बाँड धोरण अधिक बळकट करता येईल, असेही मत डॉक्टरांनी या वेळी मांडले.
.....
या आहेत समस्या
सरकारी रुग्णालयांमध्ये अजूनही औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगावे लागत असल्याने अनेक वेळा रुग्णांचे नातेवाईक व रहिवाशांमध्ये बाचाबाची होते. डॉक्टरांच्या वसतिगृहांचा प्रश्न अजूनही कायम असून वसतिगृहांच्या घरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच जे. जे. रुग्णालयात १५०० रहिवाशांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणी अनेक वेळा शासनाकडे करण्यात आली आहे; मात्र या सर्व बाबींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे दहिफळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88444 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..