
बस थांब्यासमोर बेकायदा पार्किंग
घणसोली, ता. १० (बातमीदार) : प्रवाशांच्या सुविधेसाठी नवी मुंबई महापालिका परिवहन विभागातर्फे शहरात ठिकठिकाणी बस थांबे उभारण्यात आले आहेत; मात्र काही बस थांब्यांसमोर बेकायदा वाहने पार्किंग केली जात असल्याने प्रवाशांसह बसचालकांना त्रास होत आहे. थांब्यांसमोर वाहने उभी असल्याने बस मुख्य रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
वाशी, कोपरखैरणे या विभागात दाट लोकसंख्या असल्याने मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. कोपरखैरणे ते वाशी या चार किलोमीटरच्या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. नवी मुंबईत तीनपदरी रस्ते बनवण्यात आले असूनही वापरण्यायोग्य क्षेत्र फक्त एकाच मार्गिकेचे असते; इतर दोन मार्गिकांवर वाहने उभी केली जातात. त्याचबरोबर अनेक बस थांब्यावर बेकायदा कार, टेम्पो, दुचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून वाहतूक विभागाची कारवाई थंडावल्याचे चित्र आहे.
वाशी महामार्ग ते कोपरखैरणे आणि कोपरखैरणे ते वाशी महामार्गावर दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या प्रत्येक बसथांब्यावर नो पार्किंगच्या फलकासमोर गाड्या उभ्या असतात. कोपरखैरणेमध्ये वाहतूककोंडी ही रोजचीच समस्या झाली आहे. तुर्भे एपीएमसी मार्केट परिसरातदेखील अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. यामुळे कामावरून थकून घरी जाणाऱ्या प्रवाशांना, तसेच बसचालकांना या वाहनांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या बेकायदा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
कोपरखैरणे ते वाशी विभागात मुख्य रस्त्यावरील अनेक बस थांब्यांसमोर खासगी वाहने उभे केली जातात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाहतूक विभागाने लवकरात लवकर कठोर कारवाई करावी.
- रोहन अब्राहम, आम आदमी पार्टी
नवी मुंबई वाहतूक विभागाची बेकायदा पार्किंगवर कारवाई सुरूच असते. बस थांब्यासमोर, नो पार्किंगमध्ये अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- बापूराव देशमुख, पोलिस निरीक्षक, वाशी विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88465 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..