बंडखोरांना नाईकांसोबत सुत जुळवून घ्यावे लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बंडखोरांना नाईकांसोबत सुत जुळवून घ्यावे लागणार
बंडखोरांना नाईकांसोबत सुत जुळवून घ्यावे लागणार

बंडखोरांना नाईकांसोबत सुत जुळवून घ्यावे लागणार

sakal_logo
By

बंडखोरांना नाईकांसोबत सूत जुळवून घ्यावे लागणार

अनेकांकडून अपक्ष उमेदवारीला प्राधान्य
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांच्यावर एकाधिकारशाहीचे आरोप करून शिवसेनेची वाट धरणाऱ्या बंडखोरांना अखेर नाईकांसोबत सूत जुळवून घ्यावे लागणार आहे. भाजपच्या पाठबळामुळे शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. शिंदेगट आणि भाजप आता एकत्र येऊन राज्यभरातील निवडणुका लढण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक नाईकांच्या नेतृत्वाखाली लढवली जात असल्यामुळे शिंदे समर्थकांना त्यांचे नेतृत्व स्‍वीकारावे लागणार आहे.
राज्यात व केंद्रात कोणाचीही सत्ता असली, तरी महापालिकेवर आपली सत्ता कायम करण्याचा करिष्मा गणेश नाईकांनी गत सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत दाखवून दिले आहे. मागील २५ वर्षांपेक्षा जास्त काळ एकहाती सत्ता ठेवण्याचे श्रेय नाईकांना जाते. परंतु दरम्यानच्या काळात नाईकांवर घराणेशाही आणि एकाधिकार शाहीचे आरोप करून अनेक नेत्यांनी शिवसेना गाठली. नाईकांच्या सावलीखाली मोठे झालेले तब्बल २० माजी नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. काहींनी तर नाईकांवर थेट टक्केवारीचे आरोप करून पदरी उपनेते पद पाडून घेतले. काहींच्या वाट्याला विरोधीपक्षनेते पद आले. परंतु जसे शिंदेंनी वेगळा संसार थाटला, तसे आता या नेत्यांनीही शिवसेनेला दूषणे देत शिंदेंना उघडपणे पाठिंबा दिला. या नेत्यांची शिवसेनेतून गच्छंती झाल्यामुळे त्यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत. अशा परिस्थितीत या नेत्यांना महापालिका निवडणूक लढवताना नाईकांचे नेतृत्व स्‍वीकारावे लागणार आहे. महापालिका निवडणुकीची रणनीती, तिकीट वाटप, प्रचार आणि मोर्चेबांधणी भाजप व नाईकांतर्फे होणार असल्याने या बंडखोरांना भाजपच्या नेतृत्‍वासोबत नाईकांचे नेतृत्वही स्‍वीकारावे लागणार आहे.


बंडखोरांपुढे पेचप्रसंग
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंडखोर शिवसेनेत असताना त्यांनी पॅनेल पद्धतीने निवडणुकीची तयारी करताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांसोबत सलगी केली होती. तशा पद्धतीने पॅनेलची बांधणीही केली होती. मात्र आता दोन्ही पक्षातील उमेदवार बंडखोरांसोबत लढण्यास तयार नाहीत. अशा वेळेस बंडखोरांना पॅनेलसाठी पुन्हा नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत. या निवडणुकीत बंडखोरांपुढे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षातील उमेदवारांचे आव्हान असणार आहेत. अशा परिस्थितीत बंडखोरांपुढे अपक्ष उमेदवारी लढवण्याचा पर्याय आहे. परंतु अपक्ष लढवतान भाजपचे उमेदवार समोर न देण्यासाठी समजूत काढावी लागणार आहे. या वाटाघाटी करताना बंडखोरांना माजी आमदार गणेश नाईकांचीच मनधरणी करावी लागणार आहे.


कार्यकर्ते गोळा करण्याचा केविलवाना प्रयत्न
शिंदे गटासोबत गेलेल्या नवी मुंबईतील शिवसेनेच्या काही नेत्यांपुढे कार्यकर्ते गोळा करण्याचे मोठे आव्हान आहे. याआधी शिवसेनेत असताना शिवसैनिकांनी शहराबाहेरून आलेल्या या नेत्यांचे नेतृत्व स्‍वीकारले होते. परंतु आता बंडखोरी केल्यामुळे या नेत्यांमागची कार्यकर्त्यांची गर्दी आटली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना स्वतःचे नेतेपणा टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्ते गोळा करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88479 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..