
क्रिशांकने बनवली पंख्यापासून वीज
संदीप पंडित
विरार, ता. ११ ः वसई उमेळे येथील क्रिशांक परिमल वर्तक याने पंख्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणामुळे पंखा एकीकडे हवा देईल; तसेच विजेची निर्मितीही करेल. यामुळे वीजबिल कमी होईल, असा दावाही करण्यात आला आहे. या शोधामुळे वसईकरांच्या फेट्यात मानाचे पीस खोवले गेले आहे.
क्रिशांक हा माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांना आपले दैवत मानतो. त्यांना भेटण्याची त्याची इच्छा अपुरीच राहिली. त्यानंतर रतन टाटा यांना भेटण्याची तो धडपडत करत होता. त्याने आपली इच्छा आईजवळ बोलून दाखवली. त्या वेळी त्याला आईने सांगितले की, तुला त्यांना भेटायचे असेल, तर वेगळे काहीतरी करून दाखव, म्हणजे ते स्वतः तुला भेटायला बोलावतील. त्यावर त्याने अथक प्रयत्न करून हे उपकरण बनविले आहे.
क्रिशांकची थोडक्यात ओळख
वसई तालुक्यातील उमेळे गावातील बारावीमध्ये शिकत असलेल्या क्रिशांक परिमल वर्तक याला वेगवेगळी उपकरणे शोधण्याचा छंद आहे. त्याचे वडील परिमल यांचे गावात छोटे दुकान आहे; तर आई सामाजिक कार्यकर्ता आहे. या आधी क्रिशांकचे नाव दुसऱ्या दोन प्रोजेक्टसाठी दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व एकदा एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. तसेच ४२ देशांतून आलेल्या ५० उत्कृष्ट लीडरमध्ये तरुण संशोधक म्हणून त्याचा गौरव करण्यात आला होता. तो गेल्या वर्षी बाळशक्ती पुरस्कारासाठीही नॉमिनेट झाला होता.
असा लावला या उपकरणाचा शोध
जुना फॅन, जुन्या मिक्सरचे गेर, लहान जनरेटर याचा वापर करून त्याने नवे उपकरण बनविले आहे. हे उपकरण बनविण्यासाठी त्याला महिना लागला. हे उपकरण त्याने रतन टाटा यांना डेडिकेट केले आहे. त्याने हे उपकरण पेटंटसाठी दिले आहे. तसेच या उपकरणासाठी त्याला कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्डदेखील मिळाला आहे.
या उपकरणासाठी जुना पंखा वापरला आहे. त्यातून ८० वोल्ट वीजनिर्मिती होत आहे. नवीन पंखा असेल तर साधारण १२० वोल्ट वीजनिर्मिती होऊ शकेल. माझ्या या उपकरणाची नोंद रतन टाटा यांनी घेतली, तर मला त्यांची भेट घेता येईल. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
– क्रिशांक परिमल वर्तक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88483 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..