
पनवेल महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० ः पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याआधी पनवेल महापालिकेवर पहिल्यांदाच प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. ८ जुलैला पनवेल महापालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे लोकप्रतिनिधींची समिती बरखास्त झाली आहे. यापुढे सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे सर्वाधिकार प्रशासक म्हणून देशमुख यांना येणार आहेत.
१ ऑक्टोबर २०१६ ला स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक २ मे २०१७ ला पार पडली. निवडणुकीतून नवनिर्वाचित नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ ८ जुलैला संपला आहे. त्याआधी पनवेल महापालिकेवर प्रशासकांची राजवट आली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत तीन ते चार महिने महापालिकेतील विकास कामे प्रशासकांच्या माध्यमातून चालणार आहेत. त्यामुळे प्रशासक म्हणून काम करण्यास गणेश देशमुख यांना अधिक वाव मिळणार आहे. पाच ते २५ लाखांपर्यंतचे आणि त्यापेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या प्रस्तावांना प्रशासक मंजुरी देऊ शकतात.
प्रशासकाच्या राजवटीमुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे अधिकार संपले आहेत. प्रशासनातर्फे लोकप्रतिनिधींना देण्यात आलेली वाहने आणि कार्यालये परत करावी लागणार आहेत. तसेच या पुढे लोकप्रतिनिधींना त्यांच्या लेटरहेडवर माजी नगरसेवक या नावाने पत्रव्यवहार करावा लागणार आहे.
पावसाळा संपताच निवडणुकांचे संकेत
कोविडमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसोबतच पावसाळा संपल्यानंतर पहिल्या महिन्यातच पनवेल महापालिकेची निवडणूक होणार आहेत. एमएमआर क्षेत्रात कोविडमुळे रखडलेल्या नवी मुंबई, ठाणे, मुंबई, भिवंडी, वसई-विरार या महापालिकांसोबत आता पनवेल महापालिकेचीही निवडणूक एकत्रितरीत्या होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88494 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..