
बेकायदा स्कूलबस चालकांना दणका
वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसविरोधात तपास मोहीम राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांत वाहतूक नियमभंग करणाऱ्या २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून एक लाख ८५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने त्याचा फटका स्कूल बसचालकांनाही बसला आहे. गेल्या महिन्यापासून शाळा सुरू झाल्याने स्कूल बसचालक सुखावले आहेत. मात्र अनेक स्कूल बसचालक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. दोन वर्षांपासून स्कूल बस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांची फिटनेस चाचणी करण्यात येत नसल्याने अशा वाहनांची आरटीओकडून तपासणी करण्यात येत आहे. शाळेतील मुलांना स्कूलबसमुळे कोणत्याही प्रकारचा धोका नको, यासाठी आरटीओकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
गेल्या महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे व एमआयडीसी भागातील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वाहनांमध्ये महिला सहकारी, वाहनांचा शाळेबरोबर करार, उपलब्ध आसनांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक, विमा प्रमाणपत्र तपासणी व परवान्याची वैधता अशा अनेक बाबी तपासण्यात आल्या, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. या विशेष तपासणी मोहिमेत परवानाधारक स्कूल बस व व्हॅन मिळून २५ वाहने आढळून आली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून एक लाख ८५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
अवैध स्कूल बस व बेकायदा स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यापासून आरटीओच्या कारवाईत २५ वाहने दोषी आढळून आली आहेत.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
जप्त वाहनांचा लिलाव
वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाई करून जप्त केलेल्या वाहनांचा २५ जुलै रोजी लिलाव करण्यात येणार आहे. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांच्याकडून वाहन ताब्यात घेण्याबाबत कोणतीही निर्णय घेण्यात न आल्याने ही कारवाई होणार आहे. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ई-टेडरिंग पद्धतीने लिलाव करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने जप्त केलेल्या ९९ वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88548 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..