
दृष्टीक्षेप
व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा
मालाड (बातमीदार) ः राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने तरुण-तारुणींसाठी मोफत व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन मालाडच्या रिजॉईस शाळेत करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संतोष चिकणे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी पंकज कपूर आणि एन. एस. सय्यद यांनीदेखील उपस्थित राहून तरुणांचा उत्साह वाढवला. तसेच वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि परिशिक्षक सचिन नाचनेकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले. २१ तरुण-तरुणी या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मी काऊंडर, कृष्णा वाघमारे, शशी गुप्ता, सुरेश सोलंकी, मेरी चेट्टी यांनी विशेष मेहनत घेतली, अशी माहिती वैशाली महाडिक यांनी दिली. तसेच त्यांनी येणाऱ्या काळात अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन गरीब वस्तीतील तरुणांसाठी मोफत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी आर्थिक मदत
घाटकोपर (बातमीदार) ः आषाढी एकादशीचे निमित्त साधून ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा समाजसेवक वैभव पाटील यांच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मंडळाला आर्थिक मदत केली. या वेळी अरुण शिंदे, नीलेश शिंदे, राजेंद्र लाड, नागेश गावडे आदी उपस्थित होते. पश्चिम भटवाडी येथील श्री गणेश भक्त मंडळाच्या मोद विनायक गणेश मंदिराचे गेली २८ वर्षे जीर्णोद्धारचे काम रखडून होते. मंदिराचे काम नव्याने होण्यासाठी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र पवार यांची भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. या वेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मंडळाकडे निधी उपलब्ध करून दिला. तसेच काजूपाडा येथील जयभवानी स्पोर्टस क्लब मंडळाच्या अंगणवाडीच्या नूतनीकरणसाठीदेखील निधी उपलब्ध करून दिला.
ज्ञानसंपदा हायस्कूलमध्ये दिंडी सोहळा
मानखुर्द (बातमीदार) ः गोवंडीच्या ज्ञानसंपदा हायस्कूलमध्ये शनिवारी प्रतीकात्मक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गडदे यांच्या हस्ते पांडुरंगाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर ही दिंडी काढण्यात आली. पावसामुळे ही दिंडी इमारतीच्या मजल्यांवर फेरी मारून मैदानात आली व त्या ठिकाणी तिची सांगता झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी विठोबा-रखुमाईसह विविध संत तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. विद्यार्थी विठुरायाच्या नामाचा गजर करत ठेका धरताना दिसले.
वैद्यवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात उत्सव
मुंबादेवी (बातमीदार) ः दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, गिरगाव, कुंभारवाडा, खेतवाडी, आगरीपाडा, भायखळा येथील विविध विठ्ठल-रखुमाई मंदिरांत दिंडींचे आयोजन केले होते. या वेळी महिला-पुरुषांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. गिरगावातील वैद्यवाडी येथील १७८ वर्षे जुन्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात पुजारी जोशी गुरुजी यांनी पहाटे ४ वाजता विठ्ठल-रखुमाई यांची पूजा, महाभिषेक, वस्त्र अर्पण, महाआरती करीत प्रसादवाटप केले. यंदा विठ्ठलदर्शनाला भाविकांची चांगलीच गर्दी उसळली होती, परंतु या मंदिराचे प्रकरण कोर्टात असल्याने कोर्ट आदेशानुसार एका वेळी फक्त दहा जण दर्शनास सोडले जात होते.
आषाढी एकादशीनिमित्त मोफत चष्मा वितरण
मानखुर्द (बातमीदार) ः चेंबूरच्या खारदेव नगरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त रविवारी चष्मे वितरित करण्यात आले. हे आयोजन काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सेवा मंडळ, बाल आनंद ट्रस्ट, प्रेरणा युवक मंच ट्रस्ट व निब्बाण सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने केले होते. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, गोवंडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजेंद्र घोरपडे तसेच दक्षिण-मध्य मुंबई लोकसभेचे काँग्रेस कार्याध्यक्ष लक्ष्मण कोठारी व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त चेंबूरच्या खारदेव नगरात गरजूंना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवावेळी या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नावनोंदणी असलेल्या गरजूंना हे चष्मे वितरित करण्यात आले. या वेळी सुमारे ३५० चष्म्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
मुसळधार पावसाने मुलुंड वसाहतीमधील भिंत उद्ध्वस्त
मुलुंड (बातमीदार) ः नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मुलुंड कॉलनी येथील लॉर्ड हाऊसजवळ असलेली संरक्षक भिंत अचानक कोसळली. घटनेची माहिती कळताच आमदार मिहिर कोटेचा यांनी त्वरित घटनस्थळी धाव घेतली. या वेळी त्यांच्यासोबत टी विभागाचे संबंधित अधिकारी होते. या घटनेची गंभीर दखल घेत आमदार कोटेचा यांनी जिल्हा अधिकारी आणि महापालिकेच्या आपत्ती विभागाला सदर संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी करण्यास सांगितले आहे. या भिंतीची पुनर्बांधणी आमदार निधीतून करण्यात येणार असल्याचे कोटेचा यांनी सांगितले. पालिकेतर्फे हे बांधकाम लवकरात लवकर करण्याची मागणी कोटेचा यांनी महापालिकेकडे केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88561 Txt Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..