ग्रामपंचायतींचा कचरा उघड्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतींचा कचरा उघड्यावर
ग्रामपंचायतींचा कचरा उघड्यावर

ग्रामपंचायतींचा कचरा उघड्यावर

sakal_logo
By

मनोर, ता. ११ (बातमीदार) ः तारापूर औद्योगिक वसाहतीलगतच्या बोईसर, सरावली, बेटेगाव, खैरेपाडा, सालवड, कोलवडे आणि पास्थळ ग्रामपंचायतींच्या हद्दीतून गोळा होणारा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालेल्या या ग्रामपंचायतींना कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी डम्पिंग ग्राऊंडची जागा उपलब्ध नसल्‍याने अनेक ठिकाणी उघड्यावर टाकलेला कचरा कुजून निर्माण झालेल्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विविध उद्योगांमधील कामगारांच्या वास्तव्यामुळे औद्योगिक वसाहतीलगतच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. त्‍यामुळे ग्रामपंचायतींमार्फत निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडू लागला आहे. नियोजनशून्य वस्त्या, पाणीटंचाई आणि मोठ्या नागरी समूहाकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनाला भेडसावत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीलगतच्या बोईसर, सरावली, बेटेगाव, खैरेपाडा, सालवड, कोलवडे आणि पास्थळ ग्रामपंचायतींना कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी डम्पिंग ग्राऊंड उपलब्ध नसल्याने कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे निर्माण होणारा कचरा कुठल्याही प्रक्रियेशिवाय उघड्यावर टाकला जात आहे. पावसाळ्याच्या दिवसांत कचरा कुजून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा नाही
मर्यादित आर्थिक उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर खासगी भूखंड खरेदी करणे ग्रामपंचायतींच्या आवाक्याबाहेर असल्याने डम्पिंग ग्राऊंडसाठी भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. जागा उपलब्ध झाली नसल्याने कचरा उघड्यावर टाकण्याशिवाय पर्याय नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्‍यान, जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसीचे अधिकारी नकारात्मक भूमिकेत असल्याने डम्पिंग ग्राऊंडसाठी भूखंड उपलब्ध होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

जागा मिळण्यात अडचण
गुंदले गावालगत महसूल विभागाच्या भूखंडावर घनकचरा प्रक्रिया आणि खतनिर्मिती प्रकल्प राबवण्यासंबंधी चाचपणी करण्यात आली होती, परंतु स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे पुढील कार्यवाही स्थगित करण्यात आली. सिटिझन फोरमसोबत झालेल्या बैठकीनंतर एमआयडीसीकडूनही घनकचरा प्रकल्पासाठी जागेची चाचपणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पुढे कोणतीच प्रगती झाली नाही.

पालघर-बोईसर रस्त्यावर रस्त्याला सरावली, पंचाली, खैरा फाटा ग्राऊंड, एमआयडीसीमध्ये अवधनगरच्या मागच्या बाजूस, शिवाजी नगर आरती ड्रग्स कंपनीसमोर आणि चिल्हार बोईसर रस्त्यालगत बेटेगाव, मान, वारांगडे भागात कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88572 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..