नागरिकांची सुरक्षा खड्ड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांची सुरक्षा खड्ड्यात
नागरिकांची सुरक्षा खड्ड्यात

नागरिकांची सुरक्षा खड्ड्यात

sakal_logo
By

वसई, ता. ११ (बातमीदार) ः पावसाळ्यात वसई–विरार शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांची सुरक्षाच जणू काही खड्ड्यात गेली असल्‍याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांचा प्रवास बेभरोसे झाला आहे. यामुळे दुर्घटना घडून अपघाताची शक्यता आहे. प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
वसई–विरारमध्‍ये वाहनांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बांधकामांसाठी लागणारे साहित्य ने–आण करण्यासाठी डंपर, ट्रॅक्टर, ट्रक यांची रेलचेल असते. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप, रिक्षा, बसेस ही धावतात. यासह दुचाकी, चारचाकी वाहनांचा वावर मुख्य मार्गावर असतो. अशातच पावसाळ्यामुळे वसई, विरार, नायगाव व नालासोपारा शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनेकदा वाहने घसरून अपघात घडत आहेत. एकीकडे प्रशासन रस्ते निर्मिती व दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असले, तरी कामाचा दर्जा उत्कृष्ट नसल्याने करदात्यांचा पैसा पाण्यात जात आहे; तर सोईसुविधांचा बोजवारा उडत आहे.

वसई–विरार शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे. ज्या परिसरात मोठे खड्डे आहेत ते पहिल्या टप्प्यात भरण्याच्या सूचना संबंधित बांधकाम विभागाला देण्यात आले असून लवकरच शहरातील रस्ते दुरुस्त केले जातील. नागरिकांना होणारी गैरसोय दूर करण्यात येईल.
– अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका

रस्त्यावर पडलेले खड्डे पाहता दुर्घटना होऊ शकते. प्रवास करताना नादुरुस्त रस्त्यांवर वाहनांचे नियंत्रण बिघडते. रोजच जीवाशी खेळ होत आहे.
– एस. आर. खान, नागरिक, नालासोपारा

कामण–चिंचोटी महामार्गावर भलेमोठे खड्डे झाले आहेत. अवजड वाहनांची ये–जा असणाऱ्या या मार्गावरून दुचाकीने प्रवास करताना भीतीमय वातावरण असून अंधारात तोल गेल्यास दुर्घटना घडू शकते.
– प्रकाश म्हात्रे, नागरिक, कामण

प्रवास करताना खड्ड्यांचा अडसर येत आहे. वाहन नादुरुस्त होत आहे. एकीकडे इंधनाचे दर त्यात वाहनांच्या खर्चाचा अधिक भार सहन करावा लागत आहे.
– धनंजय मोहिते, वसई

या मार्गांवर सर्वाधिक खड्डे
कामण - चिंचोटी मार्गावर रोजच अवजड वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी तीन फुटांचे खड्डे पडले आहेत; तर सोपारा - गास मार्गावर रस्तेच गायब झाले आहेत. त्याची जागा खड्ड्यांनी घेतली आहे. सातिवली, वालीव, विरार साईनाथ मार्ग, जीवदानी मार्ग, नायगाव जूचंद्र, राजावली, टिवरी मार्ग, भोईदापाडा, पेल्हार, धानीवबाग, नालासोपारा पश्चिम उड्डाणपुलाच्या खाली, तुळिंज, आचोळेसह अनेक मार्गांवर एकाच ठिकाणी शेकडो खड्ड्यांचे दर्शन रोज प्रवाशांना घडत असून हे खड्डे चुकवताना कसरत करावी लागत आहे.

अत्यावश्यक सेवांना फटका
सर्वत्र खड्डे निर्माण झाल्याने रुग्णांना इस्पितळात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसह, दुर्घटना घडणाऱ्या ठिकाणी जाणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. त्यामुळे इच्छित स्थळी पोहचण्यासाठी उशीर होत आहे.

गरोदर माता, विद्यार्थी, रुग्ण बेहाल
रिक्षा किंवा अन्य वाहनातून प्रवास करताना गरोदर मातांना त्रास होत आहे. कंबर दुखणे, हाताला झटका बसणे हा परिणाम सोसावा लागतो; तर रुग्णदेखील या खड्ड्यांच्‍या जाचातून सुटत नाहीत. अगोदरच आजाराने त्रस्त असताना प्रवासात दुप्पट त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रोज शाळेत जाणारे विद्यार्थीदेखील बेहाल झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88573 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top