
अंबरनाथमध्ये शिवसेनेला खिंडार
अंबरनाथ, ता. १२ (बातमीदार) ः अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या सुमारे २० माजी नगरसेवक तसेच नगरसेविकांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर अंबरनाथमध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर शहरातील पक्ष पदाधिकाऱ्यांमध्ये कोणाला समर्थन द्यायचे, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता काही माजी नगरसेवक, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाण्यातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर, उप शहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी अंबरनाथमधील दोन माजी उपनगराध्यक्ष याशिवाय नगरसेवक, नगरसेविका तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांसह, दोन उपशहरप्रमुख आदींनी आपल्याला पाठिंबा दर्शवल्याचा दावा केला. अंबरनाथमध्ये ५७ नगरसेवक असून दोन अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेचे २५ संख्याबळ होते. त्यातील सुमारे १९ ते २० नगरसेवकांसह भाजपमधून शिवसेनेत आलेल्या माजी दोन नगरसेवकांनी आणि शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. या निर्णयामुळे शहरात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.
योग्य वेळी भूमिका स्पष्ट करू!
१७ मे २०२० रोजी नगरपालिकेची मुदत संपली होती. १९ मे २०२० पासून नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान शिवसेनेतील घडामोडींबाबत योग्य वेळ आल्यावर भूमिका स्पष्ट करू, असे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88604 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..