
गुरुपौर्णिमेच्या यात्रांसाठी एसटी सज्ज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेनंतर आता १३ जुलै रोजी आलेल्या गुरुपौर्णिमेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून अक्कलकोट, शिर्डीसह गणेशपुरी आणि खोपोली येथे जाण्यासाठी प्रवाशांना सात जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेसचे आरक्षण सुरू झाले असून २०१९ नंतर प्रथमच गुरुपौर्णिमेला एसटी धावणार आहे.
कोकणातील गणेशोत्सव असो वा आषाढी एकादशी, या सर्व यात्रांसाठी एसटी कायम सज्ज असते. आता १३ जुलै रोजी आलेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त ठाणे, कल्याण येथून अक्कलकोट, शिर्डी, गणेशपुरी तसेच खोपोली येथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर एसटीने शहरातून सात जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून प्रवाशांच्या परतीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यंदा एसटीचे ठाणे ते अक्कलकोटचे भाडे ६५५ रुपये असणार असून या गाड्या १२ जुलै रोजी सायंकाळी लोकमान्य नगर आणि खोपट येथून रात्री सुटणार आहेत; तर कल्याण ते अक्कलकोट हे भाडे ६७० इतके असून ठाणे ते शिर्डी बसचे भाडे ३७५ रुपये असेल. या बसेस लोकमान्य नगर आणि खोपट येथूनच सुटणार आहेत; तर गणेशपुरीचे ८० आणि खोपोलीचे गगनगिरी महाराज मठाचे भाडे १०५ रुपये इतके आहे. या जादा बसेस ठाणे खोपट येथून सोडण्यात येणार असून तिकीट आरक्षण सुरू झाल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88645 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..