आषाढी एकादशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढी एकादशी
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

sakal_logo
By

विद्यार्थी रमले विठूनामाच्‍या गजरात
पालघर जिल्‍ह्यातील जवळपास सर्वच शाळांमध्‍ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद देत दिंडीमध्‍ये सहभाग घेतला. विठ्ठल-रुक्मिणी, संत मंडळी, वारकरी अशा वेषभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विठूनामाच्‍या गजरामुळे पालघर जिल्‍ह्यातील वातावरण भक्‍तिमय झाले होते.

यश विद्या निकेतनात विठ्ठल नामाची शाळा
विरार ः विरार पूर्व येथील यश विद्या निकेतन शाळेच्या संचालिका साधना राजीव पाटील यांच्या संकल्पनेनुसार विठुराया व आषाढीचे महत्त्व चिमुकल्यांना समजावे व त्यायोगे संस्कृतीचे बीज रुजावे, या उद्देशाने रविवारी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. दिंडी, रिंगण, भजन असे अनेक उपक्रम या वेळी आयोजित केले होते. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी, संत मंडळी, वारकरी अशा वेषभूषेत सहभागी झाले होते. तसेच पालकसुद्धा उत्साहाने या सोहोळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात आषाढी एकादशीची माहिती, मुख्याध्यापिका रुचिता ठाकूर व संध्या शेट्टी यांच्या हस्ते पालखी पूजन व नंतर संगीत शिक्षक सिद्धेश जाधव यांच्यासमवेत विद्यार्थी, पालक, शिक्षक, उपस्थित सर्व मंडळी भजन, कीर्तनात, अभंगात सहभागी झाले. या वेळी मंदिरातील ट्रस्टचे तसेच अतुल पाटील व त्यांचे सहकारी यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया चव्हाण या विद्यार्थिनीने आणि आभारप्रदर्शन मराठी विषय शिक्षिका नेहा राऊत यांनी केले.

विद्याविहार इंग्लिश हायस्कूलची ग्रंथदिंडी
विरार ः खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत विद्याविहार इंग्लिश हायस्कूलचे छोटे वारकरी यांनी विरारमधील विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. मंगला परब याप्रसंगी म्हणाल्या, विठुराया व आषाढीचे महत्त्व शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने शाळा दर वर्षी आषाढी एकादशी साजरी करते. शाळेतर्फे वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी, रिंगण, लेझीम, असे अनेक उपक्रम या वेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठूनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. दोन वर्षांच्या कोविड परिस्थितीनंतर निघालेल्या या वारीत आसमंत विठ्ठलमय झाला होतो.

अनुसया विद्यालयात आषाढी एकादशी
विरार ः विरार पूर्व मनवेलपाडा भागातील अनुसया विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई आणि वारकरी यांची वेशभूषा साकारली होती. या सोहळ्याला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता वर्तक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना मानकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी दिंडीतून दिला पर्यावरणाचा संदेश
सफाळे ः ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळाच्‍या इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त आगरवाडीत दिंडी काढली. या वेळी आगरवाडीवासीयांना साक्षात पंढरीची वारी आणि विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाचा लाभ अनुभवता आला. या दिंडीने आगरवाडीवासीयांना पर्यावरणाचा संदेशही दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली भोईर यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग यामध्‍ये सहभागी झाले होते. पालकांचा सहभाग देखील या वेळी उत्स्फूर्त असा होता. या दिंडीमार्फत घराघरात तुळशीचे झाड वाटप करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ग्रंथदिंडी
विक्रमगड (बातमीदार) ः भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक त्यागराज चेटटियार यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीनिमित्त मार्गदर्शन केले. फळाची अपेक्षा न करता चांगले कर्म करा, अंध-अपंगाना मदत करा आणि वैयक्तिक चारित्र्य जपा, असा संदेश दिला. यानिमित्त शिक्षक, विद्यार्थी यांनी ग्रंथदिंडी, नृत्य, भजन, फुगड्या अशा विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका आळशी व हर्षला कोटरा यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88656 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..