
गणेशपुरीत गुरुपौर्णिमा उत्सव
वज्रेश्वरी, ता. १२ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी हे स्थान स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखले जाते. बुधवारी येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी हे गाव स्वामी नित्यानंद बाबांच्या नावाने सुपरिचित आहे. या ठिकाणी विविध प्रांतांतील भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. बाबांचा गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गाभाऱ्यात स्वामींच्या मूर्तीस थेट स्पर्श करून प्रदक्षिणा घालता येत असल्याने भाविक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात. बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त पहाटे ४ वाजता महाभिषेक करण्यात येणार असून, त्यानंतर महाआरती होऊन अखंड नामस्मरण सुरू राहणार आहे. यादरम्यान मंदिर प्रशासनाकडून प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. संध्याकाळी ५ वाजता स्वामी नित्यानंद महाराजांचा गणेशपुरीत पालखी सोहळा येथील शिवाजी चौकपर्यंत निघणार आहे. भाविकांनी गणेशपुरीत स्वामी नित्यानंद महाराजांच्या गुरुपौर्णिमा उत्सवास सहकार्य करून गुरू दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88678 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..