अपूर्ण, नादुरुस्त सेवा महापालिकेच्या माथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपूर्ण, नादुरुस्त सेवा महापालिकेच्या माथी
अपूर्ण, नादुरुस्त सेवा महापालिकेच्या माथी

अपूर्ण, नादुरुस्त सेवा महापालिकेच्या माथी

sakal_logo
By

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल, ता. १४ : अपुऱ्या व नादुरुस्त सेवा पनवेल महापालिकेच्या माथी मारण्याचा घाट सध्या सिडकोने घातला आहे. खड्डेमय रस्‍ते, नादुरुस्त पावसाळी गटारे, जुनाट आणि जीर्ण मलनिस्सारण वाहिन्या त्याचबरोबर पारंपरिक पथदिवे यांचे महापालिकेकडे हस्तांतर केले जात आहेत. या सर्व सुविधा पूर्ववत करण्याकरिता दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त प्राथमिक निधीची आवश्यकता आहे. त्या कायमस्वरूपी आणि दर्जेदार करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे.

पनवेल महापालिकेची स्थापना होऊन पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. ११० किमी क्षेत्रफळांमध्ये पनवेल नगरपरिषदेचा भाग, सिडको वसाहत, त्याचबरोबर २९ महसुली गावांचा समावेश असून लोकसंख्या जवळपास आठ लाखांच्या घरात आहे. बहुतांशी नवीन वसाहती सिडकोच्या हद्दीत असल्याने पनवेल महापालिकेला या ठिकाणी काम करता आले नाही. सिडकोकडून सर्वात आधी घनकचरा व्यवस्थापन महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. त्याचबरोबर साफसफाई आणि धूरफवारणी ही सेवासुद्धा वर्ग करण्यात आली. इतर सुविधा गेल्या पाच वर्षांत सिडकोने पुरवलेल्या असल्‍या, तरी देखभाल-दुरुस्‍तीत आखडता हात घेतला आहे.
नागरिकांची दुहेरी करातून मुक्तता करण्याच्या हेतूने तसेच महापालिकेला मालमत्ताकर मिळावा, या उद्देशाने
आता सर्व सेवा वर्ग करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार रस्ते, पावसाळी गटारे, मलनिस्सारण वाहिन्या, तसेच पथदिव्यांची सोय पालिका करणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत ठराव संमत करण्यात आला आहे. मात्र या सेवा परिपूर्ण नसल्याने भविष्यात अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे.


सिडको वसाहतीत ७५ टक्के रस्त्यांची दुरवस्था
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण २३० किमी लांबीचे रस्ते आहेत. खारघरमध्ये सर्वाधिक १०० कि.मी. लांबीचे रस्ते आहेत. नवीन पनवेल आणि काळुंद्रे नोडमध्ये ६९ किलोमीटरचे रस्ते आहेत. कळंबोली आणि कामोठे वसाहतीमध्ये अनुक्रमे ३४ आणि २८ किलोमीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. यापैकी जवळपास ७५ टक्के रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महानगर गॅस, मोबाईल कंपन्या, जलवाहिन्या, वीजवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र ते पूर्ववत करण्यात आले नाहीत. अंतर्गत रस्‍त्‍यांची देखभाल आणि दुरुस्ती न केल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. हे रस्ते पूर्ववत करून देण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र सिडकोने हात वर केले आहेत.


५७७ किमी लांबीची गटारे नादुरुस्त
सिडको वसाहतीमध्ये ५७७ किलोमीटर लांबीची पावसाळी गटारे आहेत. या गटारांची अत्यंत दुरवस्था झालेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये पूर्णपणे साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती गाळ आणि कचरा त्यामध्ये साचला आहे. प्रत्येक ठिकाणी गटारे तुटलेली आहेत. तसेच झाडे गायब आहेत. दोन चेंबरमधील अंतर जास्त असल्याने नालेसफाई करता येत नाहीत. ही गटारे पनवेल महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

पथदिव्यांमुळे ५० कोटींपेक्षा जास्त भुर्दंड
पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या सिडको वसाहती आहेत, त्या ठिकाणी ११ हजारांपेक्षा जास्त संख्येने पथदिवे आहेत. ते पारंपरिक सोडियमचे आहेत. ते नादुरुस्त असल्याने कायम बंद असतात. तसेच मोठ्या प्रमाणात वीजबिलसुद्धा येते. एलईडीच्या जमान्यामध्ये सिडकोने याकडे दुर्लक्ष केले. पनवेल महापालिकेला या ठिकाणी एलईडी दिवे बसवण्यासाठी तसेच ही यंत्रणा नवीन करण्यासासाठी ५३ कोटींपेक्षा जास्त खर्च आहे.


जुनाट मलनिस्सारण वाहिन्या
सिडको वसाहतीमध्ये सुमारे २०० किमी लांबीच्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्याचबरोबर सहा हजार ६८२ इतके चेंबर आहेत. या वाहिन्यांची देखभाल-दुरुस्ती तसेच सुधारणा आणि नूतनीकरणाकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केले. कळंबोली, नवीन पनवेल त्याचबरोबर कामोठे या ठिकाणी जुन्या आणि जीर्ण झालेल्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव होता; परंतु तो आता कागदावरच राहिला आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येते. चेंबर तुंबतात. या मलनिस्सारण वाहिनी महापालिकेच्या माथी मारण्यात येत आहेत.

सिडकोकडून पनवेल महापालिकेने आहे त्‍या स्थितीमध्ये सेवा हस्तांतरित करून घेतलेल्या आहेत. या सेवांपैकी काही कामे सिडकोकडूनच सुरू आहेत. हस्तांतरणाची प्रक्रिया टप्प्याने सुरू असून महापालिकेनेही हस्तांतरित सेवेच्या कामासंबंधित निविदा काढल्या आहेत.
- संजय कटेकर, अभियंता, पनवेल महापालिका

सिडकोने महापालिका क्षेत्रातील सर्व सेवांचे हस्‍तांतर केले आहे. यापूर्वी देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी सिडकोची होती. आता ते काम पनवेल महापालिका करणार आहे.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88689 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top