
एक फोन करा...खड्डा बुजवा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे. ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, तेच रस्ते पहिल्या पावसात उखडल्याने नागरिकांचा रोष प्रशासनाला सहन करावा लागत आहे. मागील वर्षीदेखील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. टीकेची झोड उठल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात प्रशासनाने खड्ड्यांविषयी तक्रारी जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला होता. या वर्षी मात्र पालिकेने आधीच सावधतेचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून, खड्ड्यांच्या तक्रारींसाठी पालिकेने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. (०२५१) २२०११६८ हा हेल्पलाईन क्रमांक पालिकेने प्रसिद्ध केला असून, त्यावर तक्रारी नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना काही तक्रार असल्यास ‘एक फोन करा व खड्डा बुजवा’ असे सांगण्यात येत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार खड्डे बुजवण्याचे काम तातडीने प्रशासनाने हाती घेतले आहे. १० प्रभागांत १३ कंत्राटदारांच्या मार्फत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ही ४२२ कि.मी. पेक्षा जास्त असून, यात ७५ टक्के रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यांचे नुकसान होत आहे. यामुळे देखभाल-दुरुस्तीचे काम करून रस्ते वाहतूक योग्य पद्धतीने सुरू ठेवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने दिलेले आहेत. या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88700 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..