
खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर
कल्याण, ता. १२ (बातमीदार) : कल्याण पूर्व वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विविध शहरी आणि ग्रामीण भागांतील रस्ते खड्ड्यात गेल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला असून, भरपावसात अपघात होऊ नये म्हणून आता वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरत खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात मागील २४ तासांत १४९ मि.मी. पाऊस पडला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण १,२७५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जून महिन्यात पावसाने दडी मारली असताना गेले सातआठ दिवस सलग पावसाच्या हजेरीने नागरिकांना दिलासा असला तरी शहरी आणि ग्रामीण भागात असलेले रस्ते खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांसहित सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असताना आता पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, अपघात होऊ नये म्हणून कल्याण पूर्व वाहतूक पोलिस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
कल्याण पूर्वसहित पालिका हद्दीत पालिका, सार्वजनिक बांधकाम, एमआयडीसी डोंबिवली, मुंबई आदी विभागांनी रस्तेदुरुस्ती करावी, अशा मागणीचे पत्र वाहतूक पोलिस ठाणे विभागाने पाठवले. संबंधित विभागाने खड्डेही बुजवले; मात्र मुसळधार पावसाने रस्ते खड्ड्यात गेल्याने नागरिक त्रस्त आहेत.
---
वाहतूक पोलिस रस्त्यावर
कल्याण पूर्वमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत काम करत असताना वाहतूक पोलिसांनी आता खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
कल्याण वाहतूक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र क्षीरसागर, उपनिरीक्षक धनराज वाघ, सहायक उपनिरीक्षक कृष्णा कावडे, हवालदार पंढरीनाथ काळे, शिपाई सुनील सांगळे आणि प्रदीप भामरे आदींच्या पथकाने पुढाकार घेत कल्याण-शिळफाटा रोडवरील लोढा पलावा, बदलापूर चौक (काटई नाका), विद्या निकेतन स्कूल गॅप, टाटा नाका, दावडी, नेतवली चौक, चक्की नाका परिसरामधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
कोट
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिस सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत रस्त्यावर काम करत असून रस्त्यात खड्डे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असताना अनेक दुचाकी, रिक्षा चालक, कार चालक वाहतुकीचे नियम मोडत विरुद्ध दिशेने वाहन चालवत असल्याने कोंडीत भर पडते. यामुळे वाहनचालकांनी नियम पाळत वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.
रवींद्र क्षीरसागर, ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88703 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..