
शिवकर ग्रामस्थांना गावठाण विस्ताराचे वेध
कामोठे, ता. १२ (बातमीदार) : गावठाण विस्तार योजनेसाठी पनवेल तालुक्यातील मौजे शिवकर ग्रामस्थांचा अनेक दिवसापासून संघर्ष सुरू आहे. पनवेल तहसील कार्यालयाने गावठाण विस्तार योजनेसाठी वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयात सादर केला आहे. या अहवालावर प्रशासन कोणता निर्णय घेणार, याकडे शिवकर ग्रामस्थांचे लक्ष आहे.
मौजे शिवकर ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामस्थांनी गरजेपोटी गुरुचरण, वन विभाग आणि शेत जागेवर घरे व वाढीव बांधकाम केले आहे. नैना प्राधिकरणाच्या अस्तित्वामुळे वाढीव बांधकामावर गदा आली आहे. त्यामुळे वाढीव बांधकाम नियमित करणे, रेडीरेकनरप्रमाणे जमिनीला दर द्यावा, ग्रामपंचायतीला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी तसेच नैना प्रकल्पाविरोधात शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ६ डिसेंबर २०२१ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आमरण उपोषण केले होते.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पनवेल दौऱ्यातील जनता दरबारात शिवकर ग्रामस्थांच्या उपोषणावर चर्चा झाल्यावर गावठाण विस्ताराच्या प्रश्नावर अभ्यासपूर्वक तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी, प्रशासनाला शिवकर ग्रामपंचायतीचे तत्काळ सर्व्हेक्षण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सांगितले होते.
पनवेल तहसील कार्यालयाने शिवकर गावठाण विस्तार योजनेसाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील पुढील ३० वर्षांची वाढती लोकसंख्या विचारात घेतली आहे. सर्व्हे नंबर १२९/० या गुरचरण वर्णनाच्या मिळकतीच्या सातबाऱ्यावर गावठाण नोंद करण्यासाठी मंजूर ठरावाच्या प्रतीसह प्रस्ताव पनवेल प्रांताधिकारी कार्यालयाला पाठवल्याने ग्रामस्थांना विस्तार योजनेचे वेध लागले आहेत.
ग्रामस्थांच्या संघर्षामुळे गावठाण विस्तार योजना लागू करण्यासाठी प्रशासकीय कामकाजाला वेग आला आहे. गरजेपोटी केलेले वाढीव बांधकाम नियमित झाले पाहिजे. नैना प्रकल्प रद्द करून ग्रामपंचायतीला सर्वाधिकार मिळणे अपेक्षित आहे.
- अनिल ढवळे, सरपंच, मौजे शिवकर
गावठाण विस्तार योजना लागू करण्याची शिवकर ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. प्रांताधिकारी कार्यालयाला याबाबतच्या सर्वेक्षणाचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे. वरिष्ठ पातळीवर याप्रकरणी निर्णय घेतला जाईल.
- विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88716 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..