मुंबईत आरोग्य व्यवस्था अपुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत आरोग्य व्यवस्था अपुरी
मुंबईत आरोग्य व्यवस्था अपुरी

मुंबईत आरोग्य व्यवस्था अपुरी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईत महापालिकेच्या दवाखान्यांसह मनुष्यबळाची कमतरता कायम असल्याचे भीषण वास्तव पुन्हा एकदा प्रजा फाऊंडेशनने मांडले आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एका दवाखान्याची गरज असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही ३० टक्के पदे रिक्त असल्याचे प्रजा फाऊंडेशनचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांची लोकसंख्या दीड कोटींच्या घरात पोहोचली असून त्या तुलनेत आरोग्य यंत्रणेवर ताण येतो. पालिकेचे बजेटही गेल्या दहा वर्षांत १९६ टक्क्यांनी वाढले; मात्र पालिकेकडून उपाययोजनांची पूर्तता योग्य प्रकारे होत नसल्याचा दावा प्रजा फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे.
मुंबईत १५ हजार लोकसंख्येमागे एका दवाखान्याची गरज आहे. मात्र मुंबईत ६५९ दवाखान्यांची कमतरता आहे. तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून २०१० मध्ये १० टक्के रिक्त पदे होती. मात्र २०२१ रिक्त पदांचा टक्केवारी ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी (ता. १२) प्रसिद्ध केलेल्या अहवालातून या गोष्टी समोर आल्या आहेत.
...
वेळ वाढवण्याची गरज
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाते. त्यानुसार दवाखान्यांची संख्या वाढवणे अपेक्षित असून सद्यस्थितीत फक्त १८७ दवाखाने आहेत. १८७ दवाखान्यांपैकी १६४ दवाखाने सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत म्हणजेच ७ तास सुरू असतात; तर १२ दवाखाने सकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत सुरू असतात. अनेक दवाखान्यांची वेळ वाढवण्याची गरज आहे.
...
दवाखान्यांची आवश्यकता
शहरी क्षेत्रातील झोपडपट्टीत राहणाऱ्या २७ टक्के लोकसंख्येसाठी अजून १३३ दवाखान्यांची आवश्यकता आहे; तर पश्चिम उपनगरातील ४३ टक्के लोकसंख्येसाठी ३१५ दवाखान्यांची गरज आहे. पूर्व उपनगरातील ५१ टक्के लोकसंख्येसाठी २११ दवाखाने हवे आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होते आणि खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. आरोग्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करणाऱ्या मुंबई महापालिकेने आरोग्यावर भर देणे गरजेचे आहे. आरोग्यविषयक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मृत्यू आणि आजारांच्या अहवालांचे प्रभावीपणे व रियल टाइम व्यवस्थापन होणे गरजेचे आहे; तरच आरोग्य यंत्रणा सक्षम होईल आणि सरकारी दवाखान्यात चांगले उपचार मिळतील, लोकांचा विश्वास वाढेल, असे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के म्हणाले.
...
आरोग्याविषयी केवळ प्रश्न
मुंबई महापालिकेच्या विविध समित्या व सभागृहात विविध पक्षांच्या नगरसेवकांनी १०० प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये फक्त पाच प्रश्न रुग्णालय आरोग्याविषयी उपस्थित केले आहेत. त्यामुळे नगरसेवकांनाही आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचे सुचवण्यात आले आहे.
...
मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या मृत्यूंमध्ये वाढ
असंसर्गजन्य आजारांपासून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २०३० पर्यंत एक तृतीयांश कमी करणे हे भारत सरकारचे लक्ष्य आहे; परंतु २०१५ ते २०२० या कालावधीत मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अनक्रमे ५३० टक्के आणि ३३ टक्के वाढ झाली. क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांसाठी दर एक लाख लोकसंख्येमागे शून्य रुग्ण हे लक्ष्य निर्धारित केले आहे; पण २०२१ मध्‍ये एक लाख लोकसंख्येमागे २४८ टीबी रुग्णांची नोंद झाली, असे योगेश मिश्रा यांनी सांगितले.
...
मनुष्यबळाची कमतरता
महापालिकेच्या अनेक दवाखान्यांमध्ये रिक्त पदे आहेत. ही पदे भरली न गेल्याने मनुष्यबळाची कमतरता कायम भासते. शहरात २७ टक्के मेडिकल स्टाफसाठी जागा रिक्त आहेत. पॅरामेडिकल स्टाफसाठी ३४ टक्के आणि इतर कर्मचारी वर्गासाठी ३४ टक्के रिक्त जागा आहेत. पश्चिम आणि पूर्व दवाखान्यांमध्येही परिस्थिती सारखीच आहे. सर्वाधिक पश्चिम उपनगरातील पी दक्षिण वॉर्डमध्ये ५० टक्के रिक्त जागा आहेत. त्यापाठोपाठ डी वॉर्डमध्ये ४३ टक्के रिक्त जागा आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88735 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..