
डॉ. श्रीकर परदेशी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १२ : गाव, जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरचा प्रशासकीय अनुभव गाठीशी असलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्रिपद सांभाळत असताना प्रवीण परदेशी हे सनदी अधिकारी फडणवीस यांचे सचिव होते. आता श्रीकर परदेशी यांना सचिव करून एक वर्तुळ पूर्ण केल्याचे मंत्रालयात बोलले जाते आहे.
पंतप्रधान कार्यालयातून सचिव म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर परदेशी प्रख्यात जॉन हॉपकीन्स विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य या विषयाचा अभ्यास करण्यास गेले होते. तेथून ते परतले असतानाच राज्यात सत्तांतर झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच त्यांची कार्यालयात नियुक्ती केली आहे. २००१ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या परदेशी यांचे नाव सचोटीचे प्रामाणिक आणि प्रभावी अधिकारी म्हणून घेतले जाते. पाणी वाचवण्यापासून तर राष्ट्रीय क्षयरोग मुक्ती अभियानापर्यंत अनेक कार्यक्रमात त्यांनी स्वत:ची छाप पाडली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथून एमबीबीएस आणि सार्वजनिक आरोग्य विषयात एम. डी. केल्यानंतर ते प्रशासकीय सेवेत दाखल झाले.
यवतमाळ येथे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, अकोल्याचे जिल्हाधिकारी अशा जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर ते नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. तेथे सामूहिक कॉपीवर रोख आणून त्यांनी चुकीच्या सवयींवर अंकुश आणला. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना त्यांनी अतिक्रमणाविरोधात अभियान उभारले होते. त्यानंतर ते राज्यभर प्रकाशझोतात आले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच कारकिर्दीत परदेशी उपसचिव म्हणून रुजू झाले होते. कृषी, ग्रामविकास, अर्थपुरवठा, नगर व्यवस्थापन या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही ते ओळखले जातात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g88779 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..